पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

प्रकट होण्यामुळे दुर्गुण उत्पन्न झाले असे नाही. या परस्परविरुद्ध अवस्था अनादि आहेत. एकीमुळे दुसरी उद्भवली असें नाही.

 जगांतील सर्व धर्मास ही कल्पना मान्य आहे, असें वेदांताचे मत आहे. मग तो धर्म हिंदुस्थानांत जन्म पावलेला असो, अगर इतर देशांतला असो. कित्येक धर्मात ही गोष्ट पौराणिक गोष्टींच्या रूपाने दर्शित केली आहे व दुसऱ्या कित्येकांत कांहीं विशिष्ट चिन्हांच्या द्वारे दर्शविली आहे. अमुक एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्तांत परमेश्वराने जन्म घेतला आणि त्या व्यक्तीच्या द्वारें धर्म निर्माण झाला असें वेदांताचे मत नाही. एकच तत्त्व असंख्य मानवी मनांच्या द्वारे व्यक्त होऊ पाहत आहे व अशा मनांच्या समवायी चिंतनाने धर्म व धर्मप्रवर्तक निर्माण झाले असें वेदांताचे मत आहे. त्याचप्रमाणे परोपकारादि भावना आणि सर्व नीतितत्वे ही सुद्धा त्याच अद्वितीय चैतन्याची व्यक्त रूपें आहेत. या शरीरांत प्रत्ययास येणारा 'मी' वास्तविक त्या शरीराइतका क्षुद्र नसून त्याचे अनंताशी साधर्म्य आहे. याचा अनुभव सामान्य मनुष्यासहि कित्येक वेळां येत असतो. परक्याच्या दु:खाने कळवळून त्यास मदत करू जाणाऱ्याची जी स्थिति त्या विशिष्ट क्षणी असते, तिचा विचार केला तर तो स्वतःचे अस्तित्व विसरून त्या परक्याशी एकजीव झालेला असतो, असे आढळून येईल. परक्याचे दुःख तें आपलेंच दु:ख असें त्यास त्या क्षणी वाटत असतें. सर्व मानवी मनांची एकतानता नसती तर सहानुभूति वाटणे आणि परोपकाराची इच्छा उद्भवणे, या गोष्टी अशक्यच झाल्या असत्या. सहानुभूति, परोपकार आणि प्रेम हाच सर्व नीतिग्रंथांचा मूळपाया आहे. सर्व नीतिग्रंथांचें सार वेदांतानें 'तत्त्वमसि' या एकाच सूत्रांत व्यक्त केले आहे.

 'तत्त्वमसि' हेच वेदांताचे प्रत्येक व्यक्तीला सांगणे आहे. तुझें सर्व विश्वाशी ऐक्य असल्यामुळे सर्व प्राण्यांचे आत्मे म्हणजे तुझ्याच आत्म्याची अनेक रूप आहेत. सर्व बाह्य शरीरेंहि तुझ्या शरिराहून भिन्न नाहीत. तूं कोणाला दुखावलेस तर तें स्वत:ला दुखविण्यासारखेच आहे. तूं कोणावर प्रेम केलस तर स्वतःवर प्रेम करण्यासारखेच आहे. कोणाच्याहि द्वेषाचा विकार तुझ्या चित्तांत उद्भवला तर तो इतरांस जितका हानिकारक होईल तितकाच तुला स्वत:लाहि तो हानिकारक होईल. इतरांवर केलेले प्रेमहि तुझें तुला अवश्य परत मिळेल. तूंच विश्व आहेस. तूंच अनंत आहेस. या क्षणी जरी तुझ्या अनंतत्वाचा तुला