पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

हिंदुस्थानच्या भूमीचाच आश्रय केला. मुंबईचे प्रसिद्ध पारशी लोक हे त्यांचेच वंशज आहेत. सेंट टॉमस बरोबर कित्येक ख्रिस्ती लोक आले असल्याचे सांगतात. सेंट टॉमस हा खुद्द येशूच्या शिष्यांपैकीच एक होता. त्यांसहि आर्यावत आश्रय मिळाला व त्यांचेहि वंशज आजमितीस हिंदुस्थानांत आहेत. परकीयांबद्दलची आदरबुद्धि हिंदु लोकांच्या मनांतून सध्याहि नष्ट झाली नाही, व ती पुढेहि कधी नष्ट होण्याचा संभव नाही.

 आपण सर्व मनुष्ये ज्या अर्थी एकाच साध्याकरितां खटपट करीत आहों, त्या अर्थी एकमेकांचा अनादर करण्याचे आपणांस यत्किंचिहि कारण नाही, असे वेदांतधर्माचें आग्रहाचे सांगणे आहे. एखादा मनुष्य आज कमी बुद्धीचा दिसत असला ह्मणून त्याचा द्वेष करणे आणि त्याला तुच्छ लेखणे आपणांस उचित नाही. आमच्या नेत्रांवरील पडदा कालेंकरून दूर झाला आणि आमचें अंतःकरणं शुद्ध झाले ह्मणजे आपण सर्व एकच आहों असा आपणांस प्रत्यय येईल.

 अशी अत्युच्च स्थिति ज्याला प्राप्त झाली असेल, ही स्त्री आणि हा पुरुष, हा भेदहि ज्याच्या दृष्टीस दिसेनासा झाला असेल, हा आपला आणि हा.परका ही जाणीव ज्याच्या चित्तांतून नष्ट झाली असेल, हे सर्व भेद ओलांडून जो परतीरावर प्रविष्टं झाला असेल आणि ज्याला सर्व मनुष्ये परमेश्वररूप दिसू लागली असतील, तोच खरा विश्वबंधु आणि तोच खरा वेदांती.