पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२३९

दुसऱ्या उणीवा आढळल्या, तरी त्यांवरून त्याची किंमत कमी न समजतां त्याच्यांतील चैतन्यस्वरूपाकडे लक्ष द्या. कोणाहि मनुष्याला 'तूं पापी' असें ह्मणून त्याचा उपमर्द न करता त्याचे चैतन्य पूर्णरूपाने प्रकाशेल असें करणें हें धर्मशिक्षकाचे खरें काम आहे, असें वेदांताचे प्रतिपादन आहे.

 त्याचप्रमाणे जनसमूहांत प्रत्ययास येणारे चैतन्याचे सामर्थ्य हे सुद्धा मानवी मनांतील चैतन्याचेच दृश्य स्वरूप असून, तें मानवी मनांतूनच निर्माण झालें आहे. मानवी मन हे वस्तुतः ज्ञानस्वरूपच आहे. आपापल्या धर्मप्रवर्तकांस खुद्द परमेश्वराकडून ज्ञानसंदेश मिळाला होता, असे सर्व धर्माचे अनुयायी ह्मणतात. परंतु वेदांताचे तसे मत नाही. मानवी मनांतून उत्पन्न झालेले अदृश्य चैतन्य या महात्म्यांच्या रूपाने दृश्य झालें, असें वेदांताचे मत आहे. अनेक मनुष्ये आपापले निःसीम चैतन्य प्रत्यक्ष व्यक्त करण्याकरतां खटपट करीत असतात व त्या खटपटीचेंच महात्मे हे एक दृश्यं फल आहे, असें वेदांताचे मत आहे. मनुष्य परमेश्वरस्वरूप आहे, ही गोष्ट ज्यांस समजत नाही अथवा मान्य नाही अशा धर्माशी वाद घालण्याचीहि वेदांतांची इच्छा नाहीं; कारण प्रत्येक मनुष्याची खटपट, समजून अथवा न समजतांहि पूर्णत्वाकडे जाण्याकरितांच आहे असें वेदांतमताचे प्रतिपादन आहे. ही गोष्ट आज एखाद्यास न समजली तरी ती उद्यां त्याला समजेलच. यामुळे वादाचे काही प्रयोजनच उरत नाही.

 मनुष्यप्राणी हा एका लहानशा डबींत भरलेल्या कमानीसारखा आहे. ही डबी लहानशी दिसली, तरी आंतील कमान मात्र अनंत आहे. ती कमान त्या डबींतून सुटण्याची खटपट करीत आहे. या खटपटीमुळेच हा सारा व्यवहार निर्माण झाला आहे. व्यवहारांत सर्वत्र दिसून येणारी अहमहमिका, दुष्टपणा आणि इतर दुर्गुण हे मात्र या खटपटीमुळे उद्भवलेले नाहीत. व्यवहारांत हरघडी प्रत्ययास येणारी दुष्कर्मे, ही या खटपटीची कार्येहि नाहीत आणि कारणेहि नाहीत. एक हिंदु आचार्य ह्मणतात:-उंच जागी असलेल्या एखाद्या तलावांतील पाणी त्याच्या खालच्या सपाटीवरील शेतास द्यावयाचे असले झणजे त्या तलावांतून एक पाट शेतापर्यंत आणून सोडतात. त्या पाटाच्या मुळाशी एक दार केलेले असते. ते दार उघडल्याबरोबर पाणी जोराने त्या पाटावाटे उतरूं लागते. त्यावेळी पाटांतील सर्व धूळ आणि कचरा यांवरून ते पाणी जाऊं लागून गढूळ दिसू लागते. पण ही धूळ त्या पाण्याने निर्माण केली असें नसून पाण्यामुळे तिचे मळकट स्वरूप उघड झाले इतकेंच. त्याचप्रमाणे मनुष्यांतील ईश्वरांश