पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

एखाद्या वृक्षाचा अत्यंत मनोहर आणि उपयुक्त भाग म्हटला तर मोहोर हाच होय. हीच उपमा वेदांतालाहि लागू पडते. कित्येक शतकें वाढत असणाऱ्या ज्ञानवृक्षाचा, वेदांत हा मोहोर होय. कवितेच्या भाषेत बोलावयाचे म्हटले तर 'एथ चातुर्य शाहणें झालें। प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें। सुखाचे एथ ॥' असेंच ह्मणावे लागेल. वेदांतमतासंबंधी आज काही विशिष्ट गोष्टी तुह्मांस सांगावयाच्या आहेत. त्यांत प्रथम सांगण्यासारखी गोष्ट ही की, वेदांतमत हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे मत नाही. परमेश्वराचा अमुक एक दूत आला आणि त्याने वेदांत सांगितला असें नाही. कित्येक धर्मात अथवा पंथांत ज्याप्रमाणे कोणी मध्यवर्ती महात्मा असतो, तसा वेदांतमताचा कोणीहि महात्मा अथवा प्रवर्तक नाही. वेदांतधर्म व्यक्तिप्रवर्तित नसला तरी तशा धर्माशी अगर पंथाशी वेदांताचा कांहीं वादहि नाही. हिंदुस्थानांतहि बुद्ध अवतरून त्याच्यामुळे नवा धर्म स्थापला गेला, व त्यानंतरहि आजपर्यंत अनेक पंथ अस्तित्वांत आले. या सर्व पंथांचे अथवा धमोचे आद्यप्रवर्तक ह्मणून कोणी तरी विशिष्ट व्यक्ती होत्या. तसेंच ख्रिस्ती आणि महंमदी धर्महि एकाएका विशिष्ट व्यक्तीमुळेच उत्पन्न झाले. या प्रत्येक धर्मात अगर पंथांत पूजनीय अशी एक व्यक्ति आहे व त्या धर्मानुयायांतहि त्या विशिष्ट धर्ममतांपेक्षा व्यक्तीबद्दलच अधिक पूज्यभाव आढळून येतो. परंतु वेदांताचा कोणी एकच असा प्रवर्तक नाही. तसेंच वेदांतानें या धर्माचा अगर पंथांचा कधी द्वेषहि केला नाही. एवढेच नव्हे, तर वेदांतधर्म इतर धर्मास थोडाबहुत उपयुक्तच झाला आहे.

 मनुष्य हा वास्तविक परमात्मरूप आहे, हे वेदांताचे मत जगांतील सर्व धर्मास मान्य आहे. तसेच आपणाभोंवतीं दृग्गोचर होणारे सर्व विश्व परमात्म्यामुळेच दृश्य स्वरूपास आले आहे, हेहि सर्व धर्मास मान्य आहे. मनुष्यांतील सर्व सद्गुण आणि सर्व सामर्थ्य ही विश्वचैतन्याचाच भाग असून त्या दृष्टीने मनुष्यामनुष्यांतहि काही महत्वाचा फरक नाही. सर्वांच्या चैतन्याचे स्वरूप एकच. अपार समुद्रांत ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी लाटा उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे मनुष्ये ही चैतन्यसमुद्रावर उठलेल्या लाटा होत. आपणांपैकी प्रत्येकजण वस्तुतः अपार समुद्ररूप असून प्रत्येकाची खटपट ही वस्तुस्थिति प्रत्यक्ष सिद्ध करण्याकरतांच सुरू आहे. आपणांपैकी प्रत्येकजण सच्चिदानंदसमुद्र असून बाह्यतः दिसणारा भेद उपाधींच्या कमीअधिकपणामुळे उत्पन्न झाला आहे. याकरतां वेदांताचें ह्मणणे असे आहे की, एखादा मनुष्य मूर्ख असला अथवा त्याच्या अंगीं