पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेदांतमताचे जगावर घडलेले सुपरिणाम.
(अमेरिकेतील बोस्टनशहरी दिलेले व्याख्यान.)

 आजच्या विषयास आरंभ करण्यापूर्वी प्रथम तुह्मां सर्व मंडळीचे आभार मानणे इष्ट आहे असे मला वाटते. आज तीन वर्षे मी तुमच्या सहवासांत घालविली. मी अमेरिकेच्या बहुतेक भागांत प्रवास केला आणि आतां मी आपल्या देशास परत जावयास निघणार, अशा वेळी तुह्मांबद्दल जो आदरभाव माझ्या अंतःकरणांत वसत आहे, तो व्यक्त करून दाखविणे हे योग्य आहे. मी तुमच्या देशांत येऊन थोडे दिवस झाल्यावर तुमच्या देशाचा एखादा इतिहास मी लिहूं शकेन असे मला वाटले; पण आतां तीन वर्षे येथे राहिल्यावर मला असे आढळून आले की, एखादें पान भरेल इतकाहि मजकूर मला लिहिता येणार नाही; मग एखाद्या मोठ्या ग्रंथाचें नांवच नको. कोणत्याहि देशांत आपण प्रथमच गेलों ह्मणजे तेथे सर्व जग नवें असल्यासारखे दिसू लागते. पण तुमच्या या देशांत बराच प्रवास केल्यावर एक विशेष गोष्ट माझ्या लक्ष्यांत आली, ती ही की, वरवर विचार करणारास निरनिराळ्या लोकांत कितीहि भेद दिसला तरी वस्तुतः मनुष्यस्वभाव येथूनतेथपर्यंत एकच. एखाद्या देशांत कांहीं खाण्यापिण्याचे अथवा पोषाखाचे निराळे प्रकार असले, तरी त्या पोषाखाच्या आतील मनुष्य मात्र साऱ्या जगभर एकसारखाच आढळतो. सामान्य मनुष्यस्वभावांत बाह्य गोष्टींमुळे फरक पडत नाही. असे असले तरी देशोदेशींच्या चालीरीतींतहि कांहीं विशिष्ट गोष्टी आढळून येत नाहीत असें नाही. तुमच्या या देशांत मला एक विशिष्ट गोष्ट अशी आढळून आली की, लोकांची रिकामी उठाठेव करीत बसण्याकडे तमची प्रवृत्ति नाही. अमुक मनुष्य काय खातो अथवा काय पितो असल्या क्षुद्र बाबींच्या चौकशीत तुह्मी सहसा कधी पडत नाही. कोणीहि मनुष्य असो: तो मर्द असला की तुमचें त्याच्यावर प्रेम जडते. त्याला तुमच्या अंतःकरणांत जागा मिळते. या बाबतींत जगांतील इतर कोणत्याही देशांची तुमच्याशी तुलना होणार नाही.

 आमच्या वेदांतधर्माची तुह्मांस माहिती करून द्यावी, यासाठी मी तुमच्या देशी आलो. वेदांतधर्म हा अत्यंत प्राचीन धर्म आहे. जगांतील अत्यंत प्राचीन ज्ञान ज्या श्रुतीत सांठविले आहे, त्याच श्रुतींपासून वेदांताची उत्पत्ति झाली आहे.