पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आज जे अद्वैतमतवादी असतील त्यांनी चालू आयुष्यांतील आपला पूर्वानुभव चाळून पाहिला तर पूर्वी एकवेळी आपण पक्के द्वैती होतो, असे त्यांस आढळून येईल. हा देह ह्मणजेच आत्मा असा अध्यास आपणांस असेल, तोपर्यंत जग स्वप्नरूप आहे असें ह्मणण्यांत तात्पर्य नाही. नाणे हवे असेल तर जसें त्याच्या दोन्ही बाजू घेतल्याच पाहिजेत, तसेंच हे आहे. हे जग खरे आहे असे वाटत आहे, तोपर्यंत परमेश्वराचे साकार अस्तित्व मान्य केलेच पाहिजे. कारण जगाचें अस्तित्व जर खरें, तर त्याचा कर्ता कोणी तरी असलाच पाहिजे. त्या कर्त्यालाच परमेश्वर असें नांव आहे. अमुक गोष्ट कार्यरूप आहे असे वाटतें तोपर्यंत तिचे कारणहि असलेच पाहिजे. जगाचे अस्तित्व संपेल तेव्हां साकार परमेश्वराचे अस्तित्वहि संपेल. तुह्मीच ब्रह्मरूप झालां ह्मणजे तुमच्यावांचून निराळे असें कांहीं उरणारच नाही. जोपर्यंत देहाध्यास शिल्लक आहे, तोपर्यंत आपणांस जन्ममृत्यूपासून सुटका नाही. पण हा अध्यास संपला ह्मणजे विश्वरूप स्वप्नांतूनहि तुह्मी आपोआप जागे व्हाल. आज आपणांस जें कांहीं विश्वरूपाने भासत आहे, तेच ब्रह्मरूपाने दिसूं लागेल. विश्वाची जाणीव शिल्लक असतां जो परमेश्वर विश्वबाह्य वाटत होता तोच विश्वांत भरून आहे असा अनुभव येईल. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।' हेच अद्वैतमत आणि हीच वेदांताची शेवटची पायरी.