पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२३५

संसार हा सर्व मायेचा खेळ आहे. तूं अनंत आहेस. तुझ्या चैतन्यसामर्थ्याशी तुलना केली तर सूर्य, चंद्र आणि तारे हे तुझ्या प्रचंड झोतांतून उडालेल्या तुषारांसारखे आहेत. तुला जन्म नाही, आणि मृत्युहि नाही. तुला जन्म कधी झालाच नाही. मग मृत्यु तरी कोठचा ? 'न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता च जन्म । न बंधुन मित्रं गुरु व शिष्यश्चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम् ॥' असेंच तुला ह्मटले पाहिजे, असें अद्वैतमताचे आपणा सर्वांस सांगणे आहे. अद्वैतमताप्रमाणे स्वर्गलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक हे सर्व स्वप्नाप्रमाणे आहेत. स्वप्नांतून जागे झाल्यावर त्यांतील सुखाची अथवा दुःखाची किंमत सारखीच; तसेंच या प्रचंड स्वप्नांतून आपण एकवार जागे झालों ह्मणजे ब्रह्मलोकाची तरी मातब्बरी काय आहे ? जीवात्मा मुक्त होऊन स्वतःच्या सच्चिदानंदपदी आरूढ होणे, हे अद्वैतमताचे ध्येय आहे. अशा आत्म्यास कधीं क्षुद्रसुखाची तहान लागत नाही. आपल्या या क्षुद्र देहांत प्रत्ययास येणाऱ्या चैतन्याचा रसास्वाद कसा आहे, याचा अनुभव प्रत्यही आपणांस येतो. मग याच देहांत विश्वचैतन्याचा आस्वाद अनुभवितां आला तर तो आनंद कसा असेल हे कल्पनेनेंहि जाणतां येणार नाही. हेच अद्वैत मीमांसेचें सार आहे.

 वेदांतसोपानाला तीन पायऱ्या आहेत. अद्वैतमत ही शेवटची पायरी असून तिच्या पलीकडे जाणे शक्यच नाही. सर्व सृष्टीचें मूळ सांपडल्यावर त्यापलीकडे सृष्टीचा शोध कोठे लावणार? एकाच पदार्थातून हे सर्व पदार्थ निर्माण होतात, असे सिद्ध झाल्यावर रसायनशास्त्रास शोधावयाचे असें काय उरणार ? त्याच प्रमाणे विश्वचैतन्याची एकात्मकता सिद्ध झाल्यावर तत्वज्ञान तरी शोध कशाचा करणार?

 हा अद्वैतसिद्धांत सर्वासच पटतो असे नाही. केवळ बुद्धीनेंहि तो पूर्णपणे समजणें प्रथम कठीण आहे. अत्यंत कुशाग्र आणि निर्भय विवेचकबुद्धि असली तर तिचा प्रवेश येथे केव्हां तरी होण्याची आशा आहे. याच कारणामुळे सामान्य जनतेचा कल अद्वैताकडे फारसा नसतो. याकरितां आपण द्वैतापासून आरंभ करावा. द्वैतसिद्धांताचा विचार कुशाग्रबुद्धीने आपण करूं लागलों ह्मणजे विशिष्टाद्वैतमार्ग आपोआप दिसू लागतो. ज्याप्रमाणे कित्येक शतकांच्या अनुभवाने शहाणे होत होत एखादें राष्ट्र संस्कृतीचे शिखर गांठते, त्याचप्रमाणे एका व्यक्तीलाहि अनुभवाने आणि कित्येक वर्षांच्या प्रयत्नाने हे शिखर गांठले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यांत असा अनुभव आपणांस घ्यावाच लागतो.