पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

परमेश्वर या सृष्टीचे कारण आहे, हे आपण कबूल केले, तर कारणच कार्यरूप होऊन ही सृष्टि निर्माण झाली हे आमचे ह्मणणे तुह्मांस कबूल केलेच पाहिजे. ह्मणजे सृष्टि ही परमात्म्याचेच दृश्यरूप आहे असें अद्वैतमत आहे. असे असेल तर तुह्मी, मी आणि इतर सर्व वस्तु परमेश्वररूपच आहेत असें म्हटले पाहिजे. सर्वच परमेश्वर हे ह्मणणे कित्येकांस कसेंसेंच वाटते. पण तसें वाटण्याचे कारण नाही. वस्तुस्थिति तशीच आहे. माझ्या हातांतले हे पुस्तक परमेश्वर, माझें शरीर परमेश्वर, माझें मन परमेश्वर आणि माझा आत्माहि परमेश्वरच आहे. तर मग हे सर्व जीव निरनिराळे कसे उत्पन्न झाले ? परमेश्वराचे असंख्य तुकडे होऊन इतके जीव उत्पन्न झाले काय ? एकच परमेश्वर अनंत जीवरूपाने दिसतो काय ? हे झाले तरी कसे ? एकाच विश्वात्मक शक्तीचे इतके तुकडे कसे झाले ? अनंताचे तुकडे करणे शक्य आहे काय ? केवळ पवित्ररूप परमात्मा विश्वरूपाने का अवतरला? जर आज तो विश्वरूप झाला असे मानले तर उद्या तो तिसरेंच एखादें रूप घेणार नाही याचा काय भरंवसा ? जर अशा रीतीने त्याचे रूपांतर होते तर रूपांतर पावणाऱ्या प्रत्येक पदार्थास अंत आहे असें आपण पाहतों; मग परमात्म्याचाहि अंत होणार की काय ? तसेच सर्व परमात्मा विश्वरूप झाला, की, त्यांतील काही भाग विश्वरूप झाला ? इत्यादि अनेक प्रकारच्या शंकांस अद्वैतमत उत्तर देतें की 'अरे जे झालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काईं ॥' हे दृश्य विश्व भ्रमरूप आहे. हे झालेच नाही. हे सर्व स्वप्न अथवा मृगजल यासारखे आहे. जीव असा पदार्थच कोठे नाही. मग अनंत जीवांचा विचारच नको. तें एकच 'अनंत' सर्वत्र आहे. देवाच्या हजारों बिंदूंवर पडलेल्या प्रतिबिंबामुळे हजारों सूर्य दिसले तरी खरा सूर्य एकच. तसेंच हजारों मनांत प्रतिबिंबित होणारा परमात्मा एकच आहे. हजारों मनें ही देवाच्या हजारों बिंदूंसारखी आहेत व त्यांत प्रतिबिंबित झालेला परमात्मा हजारों सूर्योसारखा दिसतो. यासाठी सृष्टि ही स्वप्नवत् आहे, असें अद्वैतमताचे प्रतिपादन आहे. पण स्वप्नांत तरी खऱ्या वस्तूच दिसतात. हत्ती आपण स्वप्नांत पाहिला तरी हत्ती खरा असल्यावांचून त्याचे स्वप्न तरी कसे पडेल ? यासाठी परमात्मस्वरूप खरे असून स्वप्नांत तशी हजारों रूपें आपण पाहत आहो. शरीर, मन आणि जीव या रूपाने तुह्मी स्वप्नवत् आहां ही गोष्ट खरी, तरी सच्चिदानंद या रूपाने तुह्मी खरेच आहां. या साऱ्या विश्वाचा परमात्मा तूंच. तूंच हे सर्व विश्व निर्माण केलें आहेस आणि याचे अधिष्ठानहि तूंच आहेस. तुझा जन्म, तुझें मरण आणि तुझा