पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२३३

नाही. माझ्या बाल्यावस्थेत जे माझ्या आत्म्याचे स्वरूप असते. तेंच तारुण्यांत आणि वार्धक्यांतहि असते. त्याचप्रमाणे हे सर्व दृश्य विश्व आणि कोट्यवधि जीव मिळून परमात्म्याचे एक शरीरच आहे. या सर्वांत त्याचाच वास आहे. शरीरांत बदल झाला ह्मणून परमात्मस्वरूपांत बदल झाला पाहिजे असे नाही. जीवाच्या आणि सृष्टीच्या स्वरूपांत बदल होत असला तरी परमात्म्यांत त्यामुळे यत्किंचितहि बदल होण्याचे कारण नाही. सृष्टीत बदल होतो असे आपण ह्मणतों, पण बदल होतो याचा अर्थ काय ? याचा अर्थ इतकाच की सृष्टपदार्थाचे रूपांतर होतें. एकरूप बदलून त्याजागी दुसरे रूप येतें इतकेच. पण आत्म्याचें असें रूपांतर कधीच होत नाही. अज्ञानाच्या आवरणाने त्याचे स्वरूप आकुंचित दिसते; आणि ज्ञानानें तें प्रसरण पावल्यासारखे दिसते. आत्म्याच्या स्वरूपांत बदल म्हटला तर इतकाच. वाईट कर्मानी आत्म्याचे आकुंचन होते. ज्या कर्मानी आत्म्याचें पूर्णरूप आकुंचित होते, ती सर्व कमें पापकर्मे होत; तसेच ज्या कर्मोनी आत्म्याचा प्रकाश अधिक उज्वल होण्यास मदत होते ती सत्कर्मे होत. सर्व जीवात्मे प्रथम पवित्रच होते. पापकर्माच्या आश्रयाने ते आकुंचन पावले आहेत; परंतु सत्कर्मानी परमात्म्याची कृपा त्यांनी संपादन केली ह्मणजे ते पुन्हां पवित्र होतील. अशा रीतीने स्वतःस पवित्र करून घेणे प्रत्येक जीवात्म्यास शक्य आहे. अशा रीतीने जीवात्मा, पूर्ण व पवित्र झाला, तरी बाकीची सृष्टि पूर्वीप्रमाणेच अनंतकाल चालू राहील. वेदांतांतील ही पुढची पायरी आहे. पूर्वी सांगितलेल्या मतास द्वैत अशी संज्ञा असून या दुसऱ्या मतास विशिष्टाद्वैत अशी संज्ञा आहे. विशिष्टाद्वैतमताप्रमाणे परमात्मा, सृष्टि आणि जीव या त्रयीचे मिळून एक परमात्मशरीर बनले आहे. ही द्वैताच्या वरची पायरी आहे. द्वैतमताप्रमाणे सृष्टि ही एखाद्या यंत्राप्रमाणे असून परमेश्वर या यंत्राचा चालक आहे. विशिष्टाद्वैतमताप्रमाणे परमेश्वर विश्वबाह्य नसून विश्वांतच भरून राहिला आहे.

 या दोन मतांनंतरची पायरी अद्वैतमताची आहे. परमेश्वर विश्वांतच भरून राहिला आहे, हे विशिष्टाद्वैताचें ह्मणणे अद्वैतमतासहि मान्य आहे. परंतु सृष्टि आणि जीवात्मे हे परमात्म्याच्या शरीरासारखे असून त्यांत बदल होतो व परमाम्यांत बदल होत नाही हे विशिष्टाद्वैतमताचें ह्मणणे अद्वैतवादी कबूल करीत नाहीत. त्यावर ते अशी शंका घेतात की परमात्मा जर या विश्वाचे प्रत्यक्ष कारण असेल तर कारण व कार्य यांच्या स्वभावांत फरक कां व्हावा ? कारण आणि कार्य ही नेहमी एकस्वभाव असतात. परिस्थितीने कारणाचेच कार्यात रूपांतर होते. मग