पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

जाति नामशेष झाल्या आहेत; त्या कोठे गेल्या ? त्यांचा प्रवेश आतां मानवयोनीत झाला आहे.

 वेदग्रंथांतून नरकाचा उल्लेख सांपडत नाही. परंतु पुराणांत अनेक प्रकारच्या नरकांचे वर्णन सांपडते. जणूं काय नरकवर्णनावांचून धर्मास पूर्णत्व येत नाही! कित्येक यातनांचेंहि वर्णन पुराणग्रंथांतून केले आहे. कित्येक नरकांत मनुष्यांस अर्धेअर्धे कापण्यांत येते. कित्येक ठिकाणी त्यांस भाजण्यांत येते. पण एवढ्या सपाट्यांतहि त्या प्राण्यास मरण येत नाही. पण अशा यातनांचाहि शेवट होण्याचा काळ केव्हां तरी येत असल्याचे आश्वासन पुराणांनी दिले आहे, ही त्यांची मोठी मेहेरबानीच ह्मणावयाची! अशा स्थितीत वाईट कर्माची फळे भोगून संपल्यावर ते प्राणी पुन्हां मानवयोनीत जन्मतात. अशा रीतीने मानवयोनी ही सर्व योनीत श्रेष्ठ गणली गेली आहे. ब्रह्मलोकप्राप्तीचा संभव मानवयोनीहून इतर कोणत्याहि योनीत नाही. मानवयोनी ही कर्मयोनी असून तेथें सुख अथवा दु:ख यांची प्राप्ति करून घेणे आपल्याच हाती असते. अखंड मंडलाकार मायाचक्रांत सांपडलेल्या जीवांस मानवयोनी हे विश्रांतिस्थानासारखे असून येथून पुढील मार्ग ठरवावयाची त्यांस मुभा मिळालेली आहे. यामुळेच मानवयोनी ही देवयोनीपेक्षांहि श्रेष्ठ मानण्यांत आली आहे.

 येथवर द्वैतमताचें सामान्य निरूपण केले. आतां यापुढे वेदांतांतील अधिक उच्च मताचा विचार करूं. द्वैतमतावर जे आक्षेप येतात, त्यांचे सामान्य दिग्दर्शन येथे करावयास पाहिजे. परमेश्वर हा अनंत आहे, तसेंच सृष्टि अनंत आहे आणि जीवहि अनंत आहे, हे तुमचे ह्मणणे कबूल करता येण्याजोगें नाही. तसें कबूल केले तर अनेक वस्तु अनंत आहेत असें ह्मणणे भाग पडून अनवस्था दोष होतो. असें ह्मणणे न्यायशास्त्रासहि अनुसरून नाही. याकरितां परमेश्वर विश्वबाह्य मानणे योग्य नाही. तो विश्वांतच असून त्याचे प्रत्यक्ष कारण आहे. विश्व त्याच्या बाहेर नसून तोच विश्वरूपाने दिसू लागला असें मानणे युक्तीस अधिक धरून आहे. यावर असा एक आक्षेप निघतो की, 'परमेश्वर भिंत, टेबल, डुक्कर, चोर इत्यादि झाला आहे काय ? परमेश्वराच्या ठिकाणी इतक्या दुर्गुणांचा वास संभवतो काय ?' त्यावर आमचे उत्तर असें आहे. मला आत्मा आहे आणि शरीरहि आहे ही गोष्ट खरी; तथापि हे शरीर मणजे खरा 'मी' नव्हे. मी बालतारुण्यादि अवस्थांतून वार्धक्यांत प्रवेश करतो. अशा रीतीने माझें शरीर बदलले तरी खरा 'मी' ह्मणजे आत्मा मात्र केव्हांहि बदलत