पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२३१

होतो; व तोपर्यंत पूर्वीच्या इंद्राची शुभ फळे संपून तो पुन्हां मनुष्य होतो. ज्याप्रमाणे आपल्या या मृत्युलोकांत राजांच्या अदलाबदल्या होतात, त्याचप्रमाणे देवलोकांतहि तशाच प्रकारच्या घडामोडी नित्य सुरू असतात. आपणांस ज्याप्रमाणे मृत्यु येतो, त्याप्रमाणे देवांसहि मृत्यु गांठतो. ज्या ठिकाणी मृत्यूचे वारें नाही, अशी जागा म्हटली तर एक ब्रह्मलोकच आहे. मृत्युलोकांत आणि देवलोकांत फारसा फरक नाहीं असें पुराणांतरी लिहिलेल्या कथांवरून आढळून येते. देवलोकांत देवांची आणि दानवांची युद्धे नेहमी चालू असतात. दानवांनी देवांचा अनेक वेळां पराभव केला असल्याचे दिसून येते; तथापि देवांनी आपले वर्चस्व नेहमी कायम ठेवल्याचे दिसते. असें आहे तरी देवांनी दानवांपेक्षांहि अधिक वाईट कृत्ये केल्याचे दाखले सांपडतात. देव स्त्रियांचे मोठे चहाते होतेसें दिसते. अशा रीतीने सर्व सत्फलांचा व्यय झाला ह्मणजे देवलोकी गेलेले जीव पर्जन्याच्या पाण्यांतून अथवा अन्य प्रकारें मृत्युलोकास येऊन पुन्हां मनुष्यजन्मास येतात. जगांत दुष्कर्मे करणारी माणसें पशुंच्या योनीत जन्म घेतात. त्यांची दुष्कर्मे अगदीच वाईट प्रतीची असली तर त्यांस अगदी क्षुद्र प्राण्यांचा अथवा वनस्पतींचा जन्म येतो.

 देवयोनी ही मनुष्यापेक्षा अधिक उच्च दर्जाची असली तरी ती केवळ भोगयोनी आहे. मनुष्ययोनीप्रमाणे ती कर्मयोनी नाही. कर्म ह्मणजे ज्यापासून पुढील स्थितीवर काही परिणाम होतो तें कर्म. मनुष्ययोनीत केलेल्या कर्मानुसार कोणी एखादा देवयोनीत गेला, तर तेथे केलेल्या कर्मांची फळे भोगण्यापेक्षा त्यास कांहीं अधिक कर्तव्य नसते. देवयोनीत असतां नवीन फलदायक असे कोणतेंहि कर्म करतां येत नाही. चांगल्या कर्माची फळे भोगून संपली म्हणजे सामान्य कमें फल द्रप व्हावयास लागून त्याला पुन्हां मानवयोनीत जन्मास घालतात. तेथे त्यानें चांगली कर्मे करावी आणि ब्रह्मलोकास जावें. देवयोनीत असतां ब्रह्मलोकाची प्राप्ति होणे शक्य नाही.

 अगदी खालच्या कोटींतून उच्चतर कोटीकडे प्रवास करीत असतां प्राण्यास मध्ये पशुयोनीचा आश्रय करावा लागतो. तेथून क्रमाक्रमानें तो प्राणी मनुष्ययोनीस प्राप्त होतो. पशूंची संख्या कमी होत आहे आणि मनुष्यांची वाढत आहे, ही गोष्ट येथे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे. याचे कारण पशूचे आत्मे हळुहळू मानवयोनीत प्रवेश करीत आहेत हेच आहे. पशूच्या कित्येक