पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

सूर्यलोकास जातो. सृष्टिमालिकेंत अनेक लोकांचा अंतर्भाव झालेला आहे. आपण ज्यावर आहों तो मृत्युलोक; त्यानंतर सूर्यलोक आहे; आणि त्यानंतर चंद्रलोक असून त्याच्यापुढे विद्युल्लोक आहे. येथे त्यास त्याच्याहून अधिक पवित्र जीव भेटून तो सर्वांत उच्च अशा ब्रह्मलोकास घेऊन जातो. येथे ज्या जीवाचा प्रवेश होतो तो जन्ममृत्यूंतून सुटून त्याचा ब्रह्मलोकांत चिरकाल वास असतो. तेथे त्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात; परंतु सृष्टि निर्माण करण्याचे सामर्थ्य मात्र त्यास नसते. विश्वाचा उत्पन्नकर्ता एकटा परमेश्वरच आहे. कोणत्याहि जीवास परमेश्वर होतां येत नाही. मनुष्य परमेश्वर होऊ शकतो असें ह्मणणे पापात्मक आहे असें द्वैतवाद्यांचे मत आहे. जीवाला सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त झाले तरी त्यास जग उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मात्र कधीहि प्राप्त होणार नाही. फार झाले तर आपल्या इच्छेप्रमाणे शरीरधारी होऊन त्यास जगांत अवतरतां येते. त्याला कोणत्याही देवांस अथवा स्वतःच्या पितरांस भेटण्याची इच्छा झाली तर त्याच्या शब्दाबरोबर ते जीव त्याच्यापुढे हजर होतात. त्याला कोणत्याहि प्रकारचे दुःख प्राप्त होत नाही व त्याची इच्छा असल्यास अनंतकाळपर्यंत त्याला ब्रह्मलोकांत राहतां येतें. परमेश्वराच्या अत्यंत कृपेतला असा तो जीव असतो. त्याला कोणतेंहि कर्म करावयाचे नसते. तो अत्यंत पवित्र आणि नि:स्वार्थी असा झालेला असतो. त्याचे काम म्हटले तर फक्त परमेश्वराचें भजन करणे इतकेंच. याच्या खालच्या पायरीचे पवित्र जीव कार्यरत असतात व त्या कार्यांपासून फलप्राप्ति व्हावी अशी त्यांची इच्छा असते. कोणाला काही दान केले तर त्याबद्दल स्वर्गप्राप्ति व्हावी असे त्यांस वाटत असते. असे लोक मृत्यूनंतर चंद्रलोकास जातात व तेथे पुष्कळ काळपर्यंत सुखाने राहतात. चांगल्या कर्माची फळे संपेपर्यंत त्यांचा तेथें वास होतो. चांगली फळे भोगून झाल्यानंतर ते पुनः मृत्युलोकांत परत येतात व शिल्लक राहिलेल्या फळांप्रमाणे त्यांस बरा वाईट जन्म येतो. चंद्रलोकांत गेलेल्या जीवास आह्मी देव ही संज्ञा लावतों. ख्रिश्चन किंवा मुसलमान लोकांत देवदूतांची (Angel) जी कल्पना आहे तिच्याच तोडीची ही देवांची कल्पना आहे. हिंदूंच्या पुराणांत जी देवांची वर्णने आहेत, त्यांवरून त्यांस मिळालेली नांवें पदवीची दर्शक आहेत असे आढळून येते. जसें इंद्र या नांवाने एका विशिष्ट पदवीचा बोध होतो. ती पदवी प्राप्त होण्यास जरूर असणारी कर्मे करून कोणासहि इंद्राची पदवी प्राप्त करून घेतां येते. वेदांनी सांगितलेली विशिष्ट कर्मे केली ह्मणजे तो मनुष्य इंद्रपदास योग्य