पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२२९

जें स्वतः केवलरूप-मूलरूप-आहे त्याला जन्म शक्य नाही व ह्मणून तो मरणारहि नाही. मिश्रपदार्थातच जन्म आणि मृत्यु हीं संभवतात. कोट्यवधि जीवांवर ईश्वराचा ताबा आहे. परमेश्वर निराकार, सर्वव्यापी, आणि सर्वातरात्मा असा आहे. सृष्टि हे त्या परमेश्वराचे उपकरण असून त्याच्याद्वारे घडामोडीचा अखंड उद्योग तो करीत आहे. हे सर्व विश्व त्याच्या इच्छेवरच अवलंबून आहे, अशाप्रकारचे द्वैतवाद्यांचे मत आहे. हे त्यांचे ह्मणणे कबूल केले तर साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की, जर परमेश्वर या सर्वांचा शास्ता आहे तर जगांत इतका दुष्टपणा शिल्लक कसा राहिला आणि आपणा सर्वास अनेक प्रकारची दुःखें कां भोगावी लागतात ? यावर द्वैतवादी ह्मणतात 'हा परमेश्वराचा अपराध नाही. आपणच आपल्या दुःखाचे कारण आहों. जसें पेरावें तसें उगवतें हा न्यायच आहे. मनुष्यावर संकटें यावी ही परमेश्वराची इच्छा नाही. पूर्वीच्या जन्मी केलेल्या कृत्यांस अनुसरून त्यास चालू जन्म मिळाला आहे. जीव हा अजन्मा आहे. त्यास कोणी उत्पन्न केले नाही. तो स्वतः जी कर्मे करतो त्याचीच फळें त्यास भोगावी लागतात. अनंतकाल तो अनंत कर्मे करीत असून त्यांची फळे भोगीत आहे. त्याने चांगली कर्मे केली तर त्यास सुखाची प्राप्ति होते आणि कुकर्मानी त्यास दुःख प्राप्त होते. अशारीतीने अनंतकाल सुखदुःखांची यात्रा जीव करीत आहे.'

 जीव हा स्वभावतः पवित्र आहे, ही गोष्ट सर्व वेदांत्यांस कबूल आहे. जीव स्वभावतः पवित्र असून अज्ञानानें तो आवृत झाला आहे. कुकमें ज्याप्रमाणे अज्ञानास कारण होतात त्याचप्रमाणे शुभ कर्मेहि अज्ञानास कारण होतात. कालांतराने स्वतःचे खरे स्वरूप त्यास समजतें. जीव हा ज्याप्रमाणे वस्तुतः अजन्मा आणि अमर त्याचप्रमाणे तो स्वभावतः पवित्र आहे.

 सत्कर्माच्या आचाराने दुष्कर्माचे परिणाम नष्ट होतात आणि जीव अधिक शुद्ध स्वरूप होऊन देवयानांत प्रवेश करतो. त्याची सर्व इंद्रियें मनांत लीन होऊन राहतात. शब्दहि मनांत लीन होऊन राहतो. शब्दाबरोबर विचारहि आपोआप लीन होतात. शब्दांवांचून आपणांस विचार करता येत नाही, ही गोष्ट आपल्या अनुभवाची आहे. जेथें विचार उत्पन्न होतो तेथेंच शब्दहि उत्पन्न होतो. या रीतीने शब्द आणि विचार आपणांत लीन करून घेऊन मन स्वतः प्राणांत लीन होते आणि प्राण जीवांत लीन होतात. इतकी तयारी झाली ह्मणजे त्या दशेस आपण मृत्यु असें नांव देतो. मृत्यूनंतर जीव देहांतून बाहेर पडून