पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आकाशांत तरंगत असून ते प्राणाच्या संयोगाने आकाशांतूनच निर्माण झाले आहेत. स्थूल देह हे आकाशाचेंच स्थूलरूप असून त्यांत प्राणाची स्थूलशक्ति, हंसणे, बोलणे, धांवणे इत्यादि जडरूपाने प्रत्ययास येते. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहहि आकाशाचेंच सूक्ष्मरूप असून त्यांतून मननचिंतनादि सूक्ष्म प्राणव्यापार प्रत्ययास येतात. स्थूल देह हा बाहेरचा दृश्यदेह असून त्यांत स्थूलशक्तीचा दृक् प्रत्यय येतो, त्याच्या आंत सूक्ष्म देह असून त्यांत सूक्ष्मशक्तीचा प्रत्यय येतो; व त्या पलीकडे या शक्तीचा मध्यवर्ती चालक जीव हा असतो. आपली नखें आपण पुनःपुनः काढून टाकली तरी त्यांची जशी पुनःपुनः वाढ होते व ती जशी आपल्या स्थूल देहाचाच भाग असतात, त्याचप्रमाणे स्थूलदेह हा सूक्ष्मदेहाचाच भाग आहे. मला ज्याप्रमाणे आपली नखें कितीहि वेळां काढून टाकतां येतात त्याप्रमाणे स्थूल देहाचा त्यागहि मला अनेक वेळां करता येतो. स्थूल देह नाहीसा झाला तरी त्याबरोबर सूक्ष्मदेह मात्र जाणार नाही. प्रत्येक मनुप्याला स्थूल व सूक्ष्म देह आहेत असें म्हटले ह्मणून ते दोन परस्पर भिन्न देह आहेत असे समजू नये. अमुक हा स्थूल देह, हे जसें अंगुलिनिर्देशाने दाखवितां येते, त्याप्रमाणे सूक्ष्म देह दाखवितां येणार नाही. कारण त्याचे अस्तित्व निराळे नसून तो स्थूलदेहाला सर्वत्र व्यापून आहे. अशारीतीने प्रत्येक मनुप्यांत स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि जीव अशी त्रयी वास करीत आहे. यांपैकी स्थूल देह हा लवकर नष्ट होणारा असून सूक्ष्म देह हा बराच काल टिकणारा आहे. आणि जीव हा अमर आहे. परमेश्वर ज्याप्रमाणे अनाद्यनंत आहे, त्याचप्रमाणे जीवहि अनाद्यनंत आहे असें वेदांताचे मत आहे. त्याचप्रमाणे सृष्टीहि अनाद्यनंत आहे, परंतु तिच्या रूपांत बदल होत असतो. त्याचप्रमाणे ज्यांची ही सृष्टि बनली आहे ते प्राण आणि आकाश ही सुद्धां अनाद्यनंत असून त्यांच्या स्वरूपांतहि एकसारखा बदल सुरू आहे. परंतु जीव हा, आकाश आणि प्राण यांपासून बनला नसून तो केवळ चैतन्यरूप व अनाद्यनंत आहे. आकाश आणि प्राण यांच्या मिश्रणाने जीवाची उत्पत्ति झाली नाही ह्मणूनच तो अमर आहे. कारण मिश्रपदार्थात कालेंकरून बदल होत जातो व शेवटीं तो आपल्या कारणास परत जातो. मिश्रपदार्थाचे रूपांतर न होणे हे अपरिहार्य आहे. यासाठी स्थूल देह हा केव्हांना केव्हां अदृश्य होणारच. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहहि कालेंकरून नष्ट होईल. पण जीव मात्र केवळ मूलरूप असल्यामुळे-मिश्र पदार्थ नसल्यामुळे नष्ट होणार नाही. याच कारणाकरितां जीव अजन्मा आहे.