पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२२७

ही संज्ञा आपण देतो. स्थूल देह ज्या वस्तूंचा बनला आहे, त्या वस्तु जड असून त्यांच्याद्वारे प्रकट होणारी शक्ति ही सुद्धा जडरूपच आहे. शक्तीचा प्रत्यय स्थूल पदार्थाच्या आश्रयावांचून होत नाही. शक्ति ही पदार्थाश्रित आहे. जी शक्ति स्थूलरूपानें स्थूल देहांत प्रत्ययास येते, तिचंच अस्तित्व सूक्ष्मरूपाने सूक्ष्म देहांत असते. तिचे रूप सूक्ष्म असते तेव्हां त्यास आपण विचार ही संज्ञा देतों व तोच विचार स्थूल देहांत स्थूलरूपाने प्रत्यक्ष दिसला ह्मणजे त्यास क्रिया ह्मणतों. कोणास मारावे असा विचार माझ्या मनांत उद्भवला की त्या विचारशक्तीचें स्थूल देहांत स्थूलरूपाने रूपांतर होऊन ती शक्ति आघातरूपानें दृग्गोचर होते. मूळशक्ति विरलरूपाने सूक्ष्म देहांत होती, तेव्हां तिला विचार हे नांव होते; व तीच स्थूलरूपांत आल्याबरोबर क्रिया ही संज्ञा पावली. शक्तीचा स्थूल अथवा सूक्ष्म प्रत्यय येण्यास तिला स्थूल अथवा सूक्ष्म पदार्थाचा आश्रय करावा लागतो. यारीतीने शक्ति मूलतः एकरूप असतां भिन्न पदार्थाच्या आश्रयामुळे ती भिन्नरूपाने असते इतकेंच. तसेंच सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांतहि वस्तुतः कांहीं फरक नाही. हे दोन्ही ज्या पदार्थाचे बनले आहेत, ते पदार्थ विधर्मी नाहीत. त्यांत फरक इतकाच की त्या पदार्थांचें एक रूप अत्यंत विरल असल्यामुळे दिसत नाही व दुसरें रूप घन असल्यामुळे दिसते. ह्मणजे त्यांतील भेद गुणधर्ममूलक नसून दृष्टिमूलक मात्र आहे. पाणी घनरूप असल्यामुळे दिसते, पण त्याचीच वाफ अत्यंत विरलरूप झाली ह्मणजे ती दिसत नसूनहि गुणधर्मदृष्टया ते जसे पाणीच असते, त्याप्रमाणे सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांत एक अदृश्य असून दुसरा दिसतो इतकाच फरक आहे. आतां या देहद्वयांत जी शक्ति प्रत्ययास येते, ती कोठून येते, या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. वेदांतमताप्रमाणे एकंदर सृष्टीत दोन पदार्थ आहेत. एक आकाश आणि दुसरा प्राण. यांपैकी आकाश अत्यंत विरल परंतु जडस्वभाव आहे आणि प्राण हा शक्तिस्वभाव आहे. आपण जें कांहीं पाहतों, ऐकतों अथवा ज्याला आपण स्पर्श करूं शकतों, ते सर्व पदार्थ आकाशांतून निर्माण झाले आहेत. प्राणशक्तीशी संयोग झाला ह्मणजे आकाशच विरल अथवा घनस्वरूप धारण करतें. आकाश सर्वव्यापी आहे. तें नाही असे ठिकाणच कोठे नाही. त्याचप्रमाणे प्राणहि सर्वव्यापी आहे. आकाशाला पाण्याची उपमा दिली तर पृथिव्यादि सर्व दृश्य पदार्थ बर्फासारखे आहेत असें ह्मणतां येईल. बर्फाचे लहान मोठे व निरनिराळ्या आकाराचे तुकडे ज्याप्रमाणे पाण्यांत तरंगत असतात त्याचप्रमाणे पृथिव्यादि जड पदार्थ