पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

( centres ) मेंदूत असतात, ही गोष्ट अर्वाचीन शास्त्रांनी सिद्ध केल्याचे आपणांस अवगत आहेच. या गोलकांत दोन प्रकार असल्याचे अर्वाचीन शास्त्रांनी सिद्ध केले आहे. सांख्यमताच्या अंतरिंद्रिय आणि मन या प्रकारांशी त्या दोन प्रकारांचे अत्यंत साम्य आहे. परंतु या दोहोंचाहि चालक असा मध्यवर्ती पदार्थ अर्वाचीन शास्त्रांस अद्यापि सांपडला नाही. मेंदू तपासून पाहिला तर त्यांत बाह्येद्रियांचे गोलक सांपडतात ही गोष्ट खरी; पण त्या सर्वांच्या जागा निरनिराळ्या असून मेंदूंत कोठे तरी ते एकत्र होत असल्याचे आढळून येत नाही. तसेंच अमुक एक गोलक ( centre ) मध्यवर्ती असून इतर त्याच्या अनुरोधाने चालतात असेंहि आढळून येत नाही. हिंदु तत्ववेत्त्यांचे ह्मणणे खोडून काढण्यास अर्वाचीन शास्त्रांजवळ पुरेशी सामुग्री नाही असें एवढ्यापुरतें तरी कबूल करणे भाग आहे. या सर्वांचा चालक असा कोणी तरी असला पाहिजे हे निर्विवाद आहे. नाही तर सर्वांची फाटाफूट होऊन देहबंधहि उरणार नाही. असा चालक माझ्या देहांत नसला तर तुह्मांकडे पाहून 'हे अमुक' असा निश्चय कोण करतो ? 'हे चित्र' 'हा मनुष्य' इत्यादि निश्चय करणारा कोणी तरी मध्यवर्ती चालक असलाच पाहिजे. मेंदूतील गोलक प्रत्येकी स्वतंत्र असते तर आपल्या अनेक क्रिया एकाच वेळी चालणे अशक्य झाले असते. पाहत असतां आपणांस ऐकू आले नसते आणि श्वासोच्छास करीत असतां पाहण्याची क्रिया बंद पडली असती. अशा रीतीने आपली प्रत्येक क्रिया दुसरीपासून अगदी स्वतंत्र रीतीने घडून आली असती. यावरून गोलक प्रत्येकी स्वतंत्र असणे शक्य नाही हे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर ते सर्व जेथें एकत्र होतात व ज्याच्या अनुरोधाने ते आपापल्या क्रिया सरळ रीतीने पार पाडतात असें एक ठिकाण असले पाहिजे, हे निर्विवाद सिद्ध होते.

 हा आपला देह अनेक परमाणूंचा बनला असून तो जड व निर्विकार्य आहे. ज्याप्रमाणे हा स्थूल देह जड आहे, त्याचप्रमाणे याच्या आंत एक सूक्ष्म देह आहे असे वेदांतशास्त्राचे मत आहे. हा आंतला देहहि सूक्ष्म असला तरी जडच आहे. तो अत्यंत विरल पदार्थाचा बनला असून स्थूल देह त्याहून अधिक घन पदार्थाचा बनला आहे एवढाच त्यांच्यांत फरक आहे. सूक्ष्म देह इतका विरल आहे की, अत्युच्च प्रतीच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतूनहि तो दिसणार नाही. सूक्ष्मतरंग एकत्र सांठवून ठेवणे हे त्या देहाचें कार्य आहे. ज्याप्रमाणे स्थूल देह स्थूल पदार्थाचे आश्रयस्थान आहे त्याचप्रमाणे सूक्ष्म देह हा सूक्ष्म झणजे अत्यंत विरल-केवळ तरंगरूप-अशा पदार्थांचे आश्रयस्थान आहे. याच पदार्थास विचार