पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२२५


अस्तित्व असेल तर ते कशांतून तरी निर्माण झाले असले पाहिजे. कारण केवळ नास्तिवांतून अस्तित्व उत्पन्न होणे शक्य नाही, हा आपणांस नित्याचा अनुभव आहे. आपणांला कांहीं वस्तु निर्माण करावयाची असली तर तिचे निरनिराळे घटक आपणांस आपल्या हाताने जमवून एकत्र करावे लागतात. एखादें घर बांधलें अथवा एखादें जहाज तयार केले, तर त्या त्या वस्तूंना लागणारे कच्चे सामान पूर्वीच तयार असते व ज्या हत्यारांनी ती वस्तु आपण निर्माण केली, ती हत्यारेहि त्या वस्तूच्या पूर्वीच अस्तित्वात असतात. अशी कारणपरंपरा एकत्र करून तिच्या साहाय्याने आपण ती विशिष्ट वस्तु उत्पन्न करतो. ह्मणजे कार्यरूप वस्तूच्या आरंभी कारणरूप वस्तूचे अस्तित्व असलेच पाहिजे, हा आपणांस नित्य अनुभव आहे. याकरितां जग हे शून्यांतून निर्माण झाले, ही कल्पना विवेचकबुद्धीच्या कसोटीस उतरण्यासारखी नसल्यामुळे ती निकालांत काढली गेली, आणि जग या कार्यरूप वस्तूच्या कारणरूप वस्तू काय असाव्या याचा शोध पुढे चालू झाला. धर्माचा इतिहास पाहिला तर वस्तुतः या मूळ वस्तूच्या शोधांतच सर्व धर्म गुंतले आहेत असे आढळून येईल. हे जग परमेश्वराने निर्माण केलें असें घटकाभर गृहीत धरले तरी त्याने तें कशांतून निर्माण केलें, हा प्रश्न शिल्लक उरतोच. अनेक तत्वशास्त्रांनी आपापल्यापरी या एकाच प्रश्नाचें चर्वितचर्वण केले आहे. कोणी असें ह्मणतात की, सृष्टि, परमेश्वर आणि आत्मा (जीव) ही तिन्ही सत्यरूप असून अनाद्यनंत आहेत. यांपैकी एकासंहि अंत नाही. तसेंच सृष्टि आणि जीव ही परमेश्वरावर अवलंबून असून परमेश्वराचे अस्तित्व मात्र स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे सृष्टीतील एखाद्या जड परमाणूचे अस्तित्व परमेश्वराच्या मर्जीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे जीवाचे अस्तित्वहि परमेश्वरावरच अवलंबून आहे. हे एका पक्षाचे ह्मणणे झाले. यांपैकी फक्त जीवविषयक कल्पनेचाच आपण सध्या विचार करूं. आर्यावर्तीत जरी अनेक मते आणि दर्शनें प्रचलित आहेत, तरी त्या सर्वांना सांख्यदर्शन हे सारखेच मान्य आहे. किंबहुना सर्व मतांची उभारणी सांख्यमताच्याच पायावर झाली आहे. आपणांस कोणत्याहि वस्तूचा बोध होतो तेव्हां ती वस्तू प्रथम बाह्येन्द्रियास गोचर होऊन त्यांच्याद्वारे त्या इंद्रियांचे गोलक अथवा अंतरिंद्रियें जागी होतात. ही अंतरिंद्रियें मनास चेतवितात, मन बुद्धीवर आघात करतें आणि तो आघात बुद्धि आत्म्यास पोहोंचविते. इतकी परंपरा पूर्ण झाली ह्मणजे आत्म्याला त्या वस्तूची जाणीव उत्पन्न होते, असें सांख्यांचे मत आहे. वस्तुबोध ज्या ज्या इंद्रियांनी होतो त्या त्या इंद्रियांचे स्वतंत्र गोलक स्वा. वि. १५