पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति.

 कोणत्याही धर्माचा अगदी आरंभकालचा इतिहास अवलोकन केला तर त्यांत 'ईश्वरी प्रेरणा' अथवा 'ईश्वराने दिलेला ग्रंथ' अशा प्रकारच्या कल्पनांचा उद्भव झाल्याचे आढळून येते. अगदी रानटी स्थितींतील लोकांच्या धर्मकल्पनांशी आपणास कांहीं कर्तव्य नाही, हे उघडच आहे; कारण त्यांना धर्म ही संज्ञाहि देणे मुष्किलीचे आहे. परंतु धर्म या संज्ञेस पात्र असलेल्या कल्पनांचा इतिहाससुद्धां आरंभी सांगितल्याप्रमाणे आहे. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पना ही एकंदर धर्मविषयक कल्पनांच्या मुळाशी असल्याचे आढळते. आपल्या नजरेने दिसणारें हे विश्व निर्माण करणारा कोणी तरी असावा, ही कल्पना एकंदर धर्मकल्पनांच्या पायासारखी असून, पुढील सर्व इमारत याच मूलभूत पायावर रचिली गेली. यानंतर आत्म्याच्या कल्पनेचा उद्भव झाला. शरीर जड आहे असा अनुभव असल्यामुळे त्यांत चैतन्यरूप असा आत्मा त्याहून निराळा असला पाहिजे ही कल्पना साहजिक रीतीनेच उत्पन्न झाली.

 या कल्पना धर्माच्या आरंभकालाच्या द्योतक आहेत. हिंदुधर्माच्या इतिहासांतहि अशा प्रकारच्या कल्पनांचा उद्भव झाला होता; परंतु त्यांचे स्वरूप लवकरच बदलले. ते इतकें की तो काल आतां निवळ कल्पनेनेच जाणला पाहिजे. सांप्रतच्या हिंदुधर्माचा आरंभ या कल्पनांपासून झाला नसून त्यांचे विशिष्टस्वरूप अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. हिंदुधर्माला धर्म ह्मणून जें विशिष्टरूप प्राप्त झालें तें आरंभकालच्या ईश्वरविषयक कल्पनांमुळे नसून त्यानंतर जो कल्पनासमूह अस्तित्वात आला त्यावरून प्राप्त झाले आहे. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलची पहिली कल्पना पाहिली, तर ती शून्यांतून परमेश्वराने निर्माण केली, अशा प्रकारची आहे. सृष्टीच्या पूर्वी केवळ शून्य होते आणि परमेश्वराने केवळ आपल्या इच्छेनें सृष्टि निर्माण केली. ही आरंभीची सृष्टीच्या उत्पत्तीची कल्पना आहे; परंतु कांहीं काल लोटल्यानंतर या कल्पनेच्या सत्यत्वाबद्दल शंका येण्यास सुरुवात झा. ल्याचे आढळून येतें. आरंभी कांहींच नव्हते, तर त्यांतून सृष्टीची उत्पत्ति झाली कशी? ही शंका उपस्थित झाली. तोच * वेदांतमताचा * आरंभकाल होय. विश्वाला

[ * वेदांत * या शब्दाने सामान्यतः अद्वैतमताचा बोध हातो; तथापि द्वैत आणि विशिष्टाद्वैत या अद्वैतमताच्याच खालच्या पायऱ्या आहेत असें स्वामीजींचे मत असल्यामुळे त्यांनी वेदांत' या शब्दाने या तिन्ही मतांचा समुच्चयाने उल्लेख येथे केला आहे. ]