पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२२३ 

करणांतील तें अत्यंत गूढ तत्व मात्र अमर आहे. 'अहं ब्रह्मास्मि' हे कालस्थलाबाधित सत्य आहे. तें सत्य आहे ह्मणूनच बाकीच्यास सत्यत्व आले आहे. त्याच्याच आधाराने आपण पाहतों, ऐकतों, आणि विचार करतो. हे तत्व केवळ माझ्या अथवा तुमच्याच अंतःकरणांत आहे असे नाही, तर ते अत्यंत क्षुद्र कीटकापयेत आणि सर्व अचल सृष्टींतहि भरून उरले आहे. सत्पुरुषांच्या अंत:करणांत जसा त्याचा वास आहे, तसाच चोराच्या अंतःकरणांतहि त्याचाच वास आहे. ज्या दिवशी आपणांस हा अनुभव प्रत्यक्ष येईल, त्या दिवशी सर्व संशयनिरसन होईल. विश्व हे आपणांस आज मोठे कोडे वाटत आहे; पण 'सर्व खल्विदं ब्रह्म' हेच त्या कोड्याचे उत्तर तुह्मांस शेवटी सांपडेल. हे एकवेळ समजलें ह्मणजे आणखी समजावयाचे असें कांहींच उरत नाही. आज सर्व भौतिकशास्त्रांनी उत्पन्न करून ठेवलेले ज्ञान हे ज्ञानमार्गाचा शेवट नव्हे. खरें ज्ञान त्यापलीकडे आहे. भौतिकशास्त्रांचे ज्ञान हे खऱ्या ज्ञानमंदिराच्या पायरीसारखे आहे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' असा अनुभव होणे हेच खरें ज्ञान.