पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

असें त्याने ह्मणणे हेच पातक. 'हे सर्व विश्व जसें तूंच आहेस, त्याचप्रमाणे मीहि तूंच आहेस,' असें चिंतन सदोदित करणे हीच निराकार ब्रह्माची उपासना. 'माझ्या इंद्रियद्वारा दिसणारे सर्व विश्व मी, माझ्या भोवतालचे वातावरण मी, चंद्रसूर्यादि तेजोगोलांतलें तेज मी, सर्व प्रकाश मी, ज्याला इतर लोक चुकीच्या समजुतीमुळे अनेक रूपाने पाहतात, परंतु जें वास्तविक एकच आहे तें ब्रह्म मी आणि सृष्टीतील यच्चायावत् प्राण्यांच्या अंत:करणांतील 'मी' ही भावना सुद्धा मीच. मला मृत्यु नाही आणि निद्राहि नाही. मी सदोदित जागा असतो. मी अमर असून माझें सामर्थ्य कधीहि उणे होत नाही,' असें चिंतन सदोदित करणे-याशिवाय अन्य कोणतीहि भावना शिल्लक न उरणे, हीच परब्रह्माची उपासना होय. असें चिंतन तुह्मी सदोदित करूं लागला तर तुमचा जीवनप्रवाह सगळा बदलून जाईल. आपणा सर्वांना जर आज कशाची अत्यंत जरूर असेल तर ती अत्यंत दृढ अशा श्रद्धेची जरूर आहे. श्रद्धाहीन अंतःकरणे नेहमींच दुर्बळ असतात. मानवी अंत:करणांत जें दौर्बल्य आहे, तें श्रद्धेच्या अभावामुळे उत्पन्न झालेले आहे. ब्रह्माच्या उपासनेने आपल्या अंत:करणांतील दौर्बल्य समूळ नष्ट होईल. ही उपासना अत्यंत बळावली ह्मणजे आकाश कोसळले तरी तुमच्या आनंदांत उणेपणा येणार नाही. सर्प आणि वाघ यांचे इतरांना भय वाटले तरी तुह्मी निर्भय व्हाल. सर्प आणि वाघहि तुह्मीच. मग आपलें आपल्यालाच भय कसें वाटेल ? ब्रह्माशी एकरूप झालेला असेल तोच खरा वीर. त्याचेच अंतःकरण खरें निर्भय. त्यावांचून इतर कोणीहि निर्भय नाही. भगवान् येशु ख्रिस्ताला विश्वासघाताने ज्यांनी ठार केले, त्यांनांहि त्याने आशीर्वाद दिला. खऱ्या निर्भय अंत:करणाशिवाय ही गोष्ट करणे शक्य आहे काय ? 'मी आणि माझा पिता एकच.' हीच दृढ भावना असल्यावर तेथें भयाचा प्रवेश कोठून होणार ? हीच खरी उपासना. सर्व विश्वाशी एकरूप होणे हीच आपल्या जीविताची इतिकर्तव्यता. हे समजावयाला बाहेरच्या पुराव्यांचीहि जरूरी नाही. आपले शरीर, आपले मन आणि आपले विचार हे जितके आपल्या संनिध आहेत, त्याहूनहि परमेश्वराचे सांनिध्य अधिक आहे. तो आहे ह्मणून विचार उद्भवतात आणि मनाला मनपण प्राप्त होते. कोणत्याहि वस्तूचें यथास्थित ज्ञान मला व्हावयाचें असेल तर तें ब्रह्मज्ञानाशिवाय होणार नाही. आपल्या अंतःकरणांतील अत्यंत गूढ अशा भागांत त्याचे वास्तव्य आहे. शरीरें येतात व जातात, सुखें व दुःखेंहि येतात व जातात आणि युगामागे युगहि निघून जाते; पण आपल्या अंत: