पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आमचा धनी आणि आह्मी क्षुद्र मानव त्याचे दासानुदास हे नातें कायम राहणार. या एकंदर विवेचनावरून जगाचे अस्तित्व आहे, तोपर्यंत सगुण परमेश्वराचेंहि अस्तित्व राहणार हे सिद्ध झाले. वेदांतमताच्या प्रसाराने पूर्वीच्या धर्माची कोणतीहि हानी न होतां जग आणि परमेश्वर यांचे संबंध अधिक पायाशुद्ध होऊन अधिक दृढ मात्र होतील. याकरितां, आपल्या स्वतःच्या समाधानासाठीच वेदांतमत उत्तम रीतीने समजावून घेणे अवश्य आहे. अनेक वस्तूंचीं कारणे आणि कार्ये पाहून त्यांवरून एका वस्तूचा कार्यकारणभाव ठरविण्याकडे आपल्या विवेचकबुद्धीचा जात्याच कल आहे, याचे विवेचन एकवार झालेच आहे. यासाठी त्या बुद्धीच्या समाधानार्थ निर्गुण ब्रह्मापर्यंतचे सिद्धांत अवलोकन करणे आपणांस भाग आहे. आपणांस निर्गुण ब्रह्मापर्यंतचे सिद्धांत समजले ह्मणून सगुणाची उपासना टाकून द्यावयास पाहिजे असें नाहीं; तर ही उपपत्ति बरोबर समजली ह्मणजे सगुणोपासनेचा खरा मार्ग आपणांस सांपडेल. सध्याची आपली उपासनापद्धति किती पोरकट आहे याचा विचार करा. आपल्या क्षुद्र वासनांची तृप्ति होण्याकरितां परमेश्वराची आराधना आपण कित्येक वेळां करतों! अंतःकरणांत कुजून राहिलेल्या तुच्छ वासनांचा पाढा परमेश्वरापुढे वाचण्यापेक्षा आपण अधिक कांहींच करतांना आढळत नाही! 'प्रार्थना' 'उपासना' अशी शोभिवंत नांवें दिलीं ह्मणून ती प्रार्थना अथवा उपासना होत नाही. वेदांतमताचा प्रसार झाला, तर असल्या मूर्खपणाच्या प्रार्थना कोणी करणार नाही, एवढी मात्र गोष्ट खरी. वेदांतमताप्रमाणे निर्गुण ब्रह्मभावनेंत उपास्य-उपासक असा संबंधच होऊ शकत नाहीत. इतर धर्माचा विचार करतां त्यांत कित्येकांनी विभूतिपूजा सांगितल्याचे आढळते व तें योग्यहि आहे. रोमनक्याथलिक पंथाचे ख्रिस्ती लोक संतोपासना करतात, हेहि योग्य आहे. परंतु परमात्मरूपाची प्रार्थना करावयाची हे मात्र मूर्खत्व आहे. सर्वसमर्थाकडे जाऊन ह्मणावयाचें काय ? तर मला 'चांगली हवा दे, 'पाऊस चांगला पाड' किंवा 'माझ्या बागेत यंदां फळफळावळ पुष्कळ होऊ दे.' यापेक्षां संतोपासना शतपट अधिक चांगली. संत झाले तरी ते तुह्मां आम्हासारखेच देहधारी व क्षुद्र प्राणी होते. त्यांची मदत मागणे अगदीच वावगें नाहीं; पण विश्वाच्या शास्त्याकडे जाऊन 'अरे परमेश्वरा, माझं डोके दुखणे बंद कर' असें ह्मणणे पोरालाहि शोभणारे नाही. हजारों संतांचे आत्मे तुमच्या भोवतालच्या वातावरणांत आहेत त्यांची मदत मागा; परंतु सर्वेश्वराकडून अशा मदतीची अपेक्षा करणे आपणांस शोभत नाही. सर्व ताप