पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२१९

दुसरा पदार्थच नाही. अशा स्थितीत तें चल आहे असें तरी कसें ह्मणतां येईल? कोणताहि पदार्थ स्थिर अथवा चल ह्मणविला जाण्यास त्याला दुसऱ्या पदार्थांच्या तुलनेची अपेक्षा असते. ह्मणजे स्थैर्य आणि चलन ही परस्पर सापेक्ष आहेत. मग अशी तुलना करणे शक्य नसल्यामुळे विश्वाला गति नाही असेंच ह्मटले पाहिजे. यावरून जें न बदलणारे तें विश्वाचें सत्यरूप असून दृश्यरूप हे केवळ तरंगाकार व बदलणारे आहे. समष्टिरूपाने असलेले विश्व न बदलणारे असून तेंच अनेक व्यष्टींच्या रूपाने भासले म्हणजे त्यांत तृणादि क्षुद्र पदार्थापासून तो थेट सगुण परमेश्वारापर्यंत अनेक पदार्थाचा सामावेश होतो. सगुण परमेश्वर ही अत्युच्च दर्जाची व्यष्टि असून त्याला आपण विश्वाचा शास्ता, विश्व उत्पन्नकर्ता असें ह्मणतों; व त्याचीच प्रार्थना करतों, अथवा त्याजपुढें गुडघे टेंकतो. यावरून सगुण परमेश्वराचे अस्तित्व केवळ बुद्धिगत असून ते निराकार मूळरूपावरील एका तरंगासारखे आहे. या तरंगाचा दर्जा फार मोठा आहे, ही गोष्ट खरी; तथापि तो तरंगच आहे हेहि विसरतां येत नाही. आमच्या बुद्धीचें अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचेंहि अस्तित्व आहे. पण बुद्धीचें बुद्धिपण गेलें ह्मणजे त्या तरंगाचेंहि अस्तित्व संपलेंच. माझ्या तुमच्यासारखे सामान्य जन हे त्याच निराकाररूपावरील क्षुद्र तरंग आहेत आणि या सापेक्ष दृष्टीने सगुण परमेश्वर अत्युच्च महत्वाचा तरंग आहे. सर्व मनुष्ये परमात्मरूप आहेत असें जें वेदांतमत आहे, त्याचा अर्थ ती सगुण परमेश्वराची रूपे आहेत असे समजू नये. उदाहरणार्थ, एका मातीच्या गोळ्यांतून कांही भागाचा एक प्रचंड हत्ती तयार केला आणि शिल्लक उरलेल्या मातीचा एक लहानसा उंदीर केला, तर त्या उंदराला हत्तीचे रूप कधी तरी प्राप्त होण्याचा संभव आहे काय ? परंतु दोघांसहि पाण्यात बुडविले आणि त्यामुळे ते आपल्या मूळरूपास गेले तर दोघांचाहि एकच चिखल बनेल. केवळ वस्तुतः विचार करतां दोघेहि मातीचे बनविलेले ह्मणून एकरूपच होत; परंतु एकच माती हत्ती आणि उंदीर अशा द्विधा रूपास गेली की, त्या दोन रूपांत फरक उत्पन्न होऊन तो कायम राहणारच. त्याचप्रमाणे ब्रह्म हे त्या मातीसारखे आहे. त्यांतून सगुण परमेश्वर आणि आपण उत्पन्न झालो. सगुण परमेश्वर तुह्मां आह्मांपेक्षा अधिक महत्वाची व्यष्टि असल्यामुळे तो जगाचा शास्ता आणि आपण त्याचे दास असें झालें. ज्याप्रमाणे मातीचा हत्ती आणि उंदीर यांची फिरून माती होईपर्यंत त्यांच्या महत्वांत कायमचा फरक राहणार, त्याचप्रमाणे आह्मी देहधारी मनुष्ये आहों तोपर्यंत सगुण परमेश्वर