पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आपण आपली खात्री करून घ्या. माझ्या भोवती असलेल्या वातावरणाची या क्षणी जी स्थिति आहे, त्या स्थितींत माझें एक विशिष्टरूप तुझांस दिसते, पण ही स्थिति बदलली तर मी तुम्हास कांहीं वेगळाच दिसू लागेन. वातावरणाच्या व उजेडाच्या निरनिराळ्या अवस्थेत एकाच मनुष्याचे निरनिराळे फोटो घेतले तर त्यांत फरक पडतो, हे आपणांस अनुभवाने समजण्याजोगे आहे. याकरितां वातावरण आणि तुमचें इंद्रियजन्य प्रतीतीचें ज्ञान यांवर माझ्या चेहऱ्याचा खरेपणा, अवलंबून आहे. या दोहोंत कांहीं फरक झाला तर माझा तोच चेहरा तुह्मांस निराळा दिसू लागेल. मग ज्याचें सत्यत्व केवळ सापेक्ष आहे, तो माझा चेहरा खरा की खोटा ? पण असे असले तरी, केव्हांहि न बदलणारे असें एक तत्व माझ्यांत आहे ही गोष्टहि खरीच आहे. तें तत्व निराकार असून तेच माझें सत्यस्वरूप आहे, व तेच अनेक वेळां अनेक रूपांनी आकाराला येऊन प्रतीत होतें. ह्मणजे निराकार 'मी' सदैव सत्य व न बदलणारा असून त्यावरच तरंगरूपाने भासणारे अनेक 'मी' आकार बदलणारे आणि ह्मणून खोटे आहेत. पाळण्यांत पडून रडणारा 'मी', त्याहून थोडा मोठा 'मी, तारुण्याच्या भरांत जगाला तुच्छ समजणारा 'मी' आणि वृद्धावस्थेंत त्याच जगाच्या मदतीची अपेक्षा करणारा 'मी', हे सर्व 'मी', एकाच निराकार आणि सत्य 'मी'चे अनेक साकार, बदलणारे आणि ह्मणून असत्य असे तरंग आहेत. माझें शरीर आणि माझे विचार प्रत्येक दिवशी बदलत आहेत याचा अनुभव येत असतांहि या बदलणाऱ्या आकाराच्या मुळाशी एक न बदलणारे आणि अविनाशी तत्व आहे, याचाहि मला अनुभव येतो. याच अविनाशी आणि न बदलणाऱ्या तत्वावर मी अनेक देह धारण करतो. याचप्रमाणे अनेकधा दिसणाऱ्या या विश्वाच्या मुळाशी एक अविनाशी व न बदलणारे तत्व आहे. या विश्वरचनेकडे पाहिले तर त्यांतील प्रत्येक पदार्थाचें प्रत्येक क्षणीं रूपांतर होत आहे असें आपणांस आढळून येते. असे असतांहि विश्वाच्या सर्वसामान्य स्थितींत अनंतकालापासूनहि काही बदल झाला नाहीं हेहि आपणांस कळतें. गति हा शब्द सापेक्ष आहे. अमक्या पदार्थाला गति आहे असें आपण ह्मणतो त्यावेळी त्या कल्पनेच्या मुळाशी दुसऱ्या स्थिर पदार्थांची कल्पना आपल्या मनांत असतेच. ही खुर्ची स्थिर आहे. कां ? तर मला गति आहे ह्मणून. भोवतालच्या स्थिर पदार्थाकडे पाहून मी स्वतःला गति आहे असें ह्मणतो. जर एकसमयावच्छेदेंकरून आपण या विश्वाकडे अवलोकन केले तर तें स्थिर आहे, असेंच आपणांस ह्मणावें लागेल. त्याच्याशी ताडून पहाण्यास