पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२१७

निराकार ब्रह्माची व्याप्ति कबूल केली तर त्याच्या पोटांत सगुण आणि साकार परमेश्वराची व्याप्ति राहूं शकेल. विश्व या संज्ञेनें ज्या काही वस्तूंचा आपणांस बोध होतो, ती वास्तविक एकाच निराकार वस्तूची अनेक रूपे आहेत. आमच्या पंचेंद्रियद्वारा तिचे जे काही रूप दिसते त्याला आपण जडजग अशी संज्ञा देतो. माझ्या पांच इंद्रियांनी मला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असा पांच प्रकारचा बोध होतो. एखाद्या वस्तूकडे मी अवलोकन केले ह्मणजे तिच्यांतील पांच गुण या पांच इंद्रियांनी मी अनुभवतों व ती वस्तु अमुक असें मी ह्मणतों. आतां या पांच इंद्रियांहून कांहीं अधिक इंद्रिये एखाद्याला असली तर तीच वस्तु त्याला निराळी दिसेल हे उघड आहे. आपणांपैकी एखाद्याला विद्युत् इंद्रियाची प्राप्ति झाली, तर त्याला हे सर्व विश्व कांही निराळ्याच प्रकारचे प्रतीत होईल. वस्तु एकच असतां ती अनेक प्रकारांनी प्रतीत होत आहे व सगुण आणि साकार परमेश्वराची प्रतीति ही त्याच वस्तूची अत्युत्कृष्ट प्रतीति आहे. वस्तुज्ञान करून घेण्याचे जें सामर्थ्य मानवीबुद्धीत वास करीत आहे, त्या सामर्थ्यांची ही अगदी अत्युच्च दशा आहे. याकरितां मन, बुद्धि इत्यादि अंतवृत्ती शिल्लक आहेत, तोंपर्यंत, जशी ही खुर्ची खरी आहे आणि जसें हे जग खरे आहे त्याचप्रमाणे सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वहि सर्वथैव खरेंच आहे; पण मन हरवलें, बुद्धि लुप्तप्राय झाली आणि अहंकार मावळला तर काय होईल ? तर खुचीचें खुर्चीपण जाईल, जगाचे जगपण नष्ट होईल आणि त्याचप्रमाणे सगुण आणि साकार परमेश्वराचे परमेश्वरत्वहि नष्ट होऊन शेवटी जे काही उरेल तें केवलरूप मात्र उरेल. ज्या इंद्रियांच्या द्वाराने जगाची प्रतीति होते त्या इंद्रियांनी आपापली कामें सोडल्यावर 'हें विश्व आहे' इतकीहि प्रतीति होणार नाही; मग सगुण आणि साकार परमेश्वराची व्याप्ति तरी राहणार कोठे? मुळापासून उपटलेल्या वृक्षाची पाने, फुलें आणि फळे आपोआप गळून पडली तर त्यांत नवल ते काय ? याकरितां, सगुण आणि साकार परमेश्वराची भावना ही अत्युच्च कोटीची भावना असली तरी ती भावनाच आहे. तें निर्भेळ सत्य नव्हे. या भावनेचं खरें स्वरूप इतकेंच की, निर्गुण निराकार आणि सत्यस्वरूपावरच या भावने अस्तित्व आहे ह्मणून तिच्यांत सत्यत्व आहे. तिचे सत्यत्व निरपेक्ष नसून सापेक्ष मात्र आहे. मी मनुष्यप्राणी आहे हे जितकें खरें आहे तितकेंच, सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वहि खरे आहे. माझें अस्तित्व खरे आहे आणि खोटेंहि आहे. मी असें ह्मणतों याचे आपणांस आश्चर्य वाटावयास नको; त्याबद्दल