पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

ह्मणजे एकाच्या दृष्टीने जे वाईट तेंच दुसऱ्याच्या दृष्टीने चांगलें झालें, असें नाहीं काय? याकरितां चांगले आणि वाईट, सुख आणि दु:ख व पुण्य आणि पाप ही द्वंद्वे वस्तुगत नसून केवळ आपल्या दृष्टीमुळे उत्पन्न झाली आहेत, हे नि:संशय सिद्ध होतें. साकार व सगुण परमेश्वराची व्याप्ति नेहमीच सापेक्ष असणार. ह्मणजे जगांत कांहीं तरी वाईट आहे व तें नित्य वाईट राहणार ह्मणून अशा स्थितीच्या अपेक्षेनें परमेश्वर विश्वबाह्य, साकार व सगुण मानावा लागतो. परंतु वेदांतधर्मानें प्रतिपादिलेल्या निर्गुण व निराकार ब्रह्माचे स्वरूप सापेक्ष नाही. तें केवलरूप आहे. ह्मणून ते बरेंहि नाही व वाईटहि नाही. तें गुणाच्या पलीकडचे रूप आहे. याकरितां चांगले ह्मणजे परमात्मपदाच्या अधिक जवळ पोहोचलेलें रूप आणि वाईट ह्मणजे परमात्मपदापासून अधिक लांबचें रूप, इतकेंच फार तर ह्मणतां येईल.

 निर्गुण आणि निराकार ब्रह्माचीच व्याप्ति सर्वत्र आहे असे मानले, तर त्यापासून आमचा अधिक फायदा काय होईल ? त्रिविध तापांनी पोळलेल्या आह्मां प्रापंचिकांस त्यापासून समाधानाची प्राप्ति होईल काय? आह्मी दुर्बळ अंत:करणाचे आहों असा आह्मांस नित्य अनुभव येतो. अशा प्रसंगी आम्हास कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा वाटते. अशा वेळी तुमच्या निर्गुण आणि निराकार ब्रह्मापासून आम्हास मदत काय होणार आणि शांति काय मिळणार ? एखादें संकट आले ह्मणजे कोणाची तरी मदत मागण्याची इच्छा आमच्या अंतःकरणांत उद्भवते, ती नष्ट होईल काय ? असे अनेक प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. त्यांस आमचे उत्तर असें आहे की, मानवी अंतःकरणाची दुर्बलता कायम आहे तोपर्यंत सगुण आणि साकार परमेश्वराची त्याची भावना कायम राहील; पण फरक इतकाच की, तिच्यांत सध्या जो निवळ भोळेपणाचा भाग आहे तो नष्ट होऊन ती भावना अधिक सशास्त्र होईल. निःसीम आणि केवळ सच्चिदानंदरूप ब्रह्माच्या भावनेमुळे सगुण आणि साकार परमेश्वराविषयींची भावना अधिक शुद्ध अतएव अधिक दृढ होईल. केवळ सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्व मानले तर त्यावर अनेक आक्षेप निघून त्याचे अस्तित्व बाधित होते, हे आपण नुक्केंच पाहिले आहे. निर्गुण आणि निराकार ब्रह्माची व्याप्ति कबूल केल्यावांचून सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वच सिद्ध होऊ शकत नाही. विश्वाच्या बाहेर न, सगुण आणि साकार परमेश्वराने हे विश्व निर्माण केलें, ही उपपत्ति सिद्ध होत नाही, हे अगोदर दाखविलेंच आहे. परंतु सकल विश्वांतर्गत, निर्गुण आणि