पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२१५

आहे असें ह्मणणारे लोक अन्य रीतीनें परमेश्वराच्या व्याख्येची अशीच पूर्तता करीत असतात. परमेश्वर जसा सद्गुणैक मूर्ति तसाच सैतान दुर्गुणैकमूर्ति. सद्गुण आणि दुर्गुण इत्यादि द्वंद्वे प्रतीत होत आहेत त्या अर्थी दोन्ही गुणांचे पुतळे जोडीनेच वास करतात, असे मानण्यावांचून गत्यंतर नाही. यावरून सद्गुणैक मूर्ति परमेश्वराचे अस्तित्व मानणे चुकीचे आहे असे आपणांस दिसून येते. परमेश्वराचे सत्यस्वरूप पाहण्यास आपणांस गुणांच्या पलीकडे जाणे भाग आहे. या दृष्टीने विचार केला ह्मणजे आपणांस असे आढळून येईल की, चांगले आणि वाईट ही एकाच वस्तूची दोन अंगे आहेत. एकच वस्तु दोन निराळ्या स्वरूपांनी व्यक्त झाली आहे.

 खऱ्या दृष्टीने पाहतां चांगले आणि वाईट असा भेद पाहणे ही दृष्टीच खोटी आहे. हा फरक वस्तूंत नसून आमच्या दृष्टीमुळे उत्पन्न झाला आहे. अमुक चांगले आणि तमुक वाईट ही भावना रूढ झाल्याने मानवजातीचें भयंकर नुकसान मात्र झाले आहे. वाईट आणि चांगले ही वस्तुतः भिन्न आहेत. व ती चिरकाल भिन्नच राहणार, ही कल्पना आमच्यांत अनेक भेद उत्पन्न करण्यास मात्र कारण झाली. अमुक वस्तु अनंतकाल चांगली राहील अथवा तमुक वस्तु चिरकाल वाईट राहील असे कोणी मला सिद्ध करून दाखवील, तर त्याला मी शतशः प्रणाम करीन. जगांतील अमुक एक आढळणारी वस्तु अथवा परिस्थिति चिरकाल एकाच स्वरूपाची राहील असें छातीवर हात ठेवून कोणास सांगतां येणे शक्य आहे काय ? आज जे काही चांगले ह्मणून आपण ह्मणतो, तेच उद्यां परिस्थिति बदलली तर आपणांस वाईट दिसूं लागेल. तसेंच आजचे वाईट उद्यां चांगले वाटण्याचाहि संभव आहे. तसेच तुह्मी ज्याला वाईट असें नांव देतां तेंच माझ्या विशिष्ट परिस्थितीमुळे मला हितकर असू शकेल, व त्यामुळे मी त्याला चांगलें ह्मणेन. एकंदरीत, ध्यानांत ठेवण्याचा मुख्य मुद्दा हा की, एकंदर जगाच्या उत्क्रांतीबरोबरच चांगल्याची व वाईटाचीहि उत्क्रांति होत आहे. उत्क्रांतितत्वास अनुसरून प्रत्येक वस्तूंत प्रत्येक क्षणी रूपांतर सुरू आहे. यामुळे एकाच वस्तूच्या एका विशिष्ट रूपास आपण चांगले ह्मणतों व त्याच वस्तूच्या दुसऱ्या स्वरूपास आपण वाईट असें नांव देतो. प्रचंड झंझावात सुटला आहे अशा वेळी त्या वातामुळे उपडलेलें झाड माझ्या एखाद्या मित्राच्या डोक्यावर पडून त्याचा प्राण गेला तर ते वादळ वाईट असें मी ह्मणतो; परंतु त्या वादळामुळे हजारों रोगकारक जंतूंचा नाश होऊन त्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले असतील !