पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

इच्छेनें परमात्मपटावर ही चित्रे रंगवितों, तर ती सर्वांची एकसारखींच कशी उठतात? याचे कारण असे आहे की आपण सर्व एकाच मानसिक परिस्थितींतले असल्यामुळे भिन्नशरीरी असतांहि वस्तुतः एकच प्राणी आहों. यामुळे आपण रंगविलेली चित्रंहि एकाच प्रकारची दिसतात. मानसिक परिस्थितीत अत्यंत साम्य असल्यामुळे एकाच परिस्थितीत अनुभवांची भिन्नता उत्पन्न होत नाही. यामुळे 'चंद्र' ह्मटल्याबरोबर आपणा सर्वांसमोर एकच चित्र उभे राहते. आपल्या आजच्या मानसिक परिस्थितीत दगड आपणांस जडवस्तु दिसते; परंतु आपली ती परिस्थिति बदलली तर दगडांतील चैतन्य आपणांस दिसू लागून तो जडवस्तु नाही असे आपण ह्मणूं. आपणांस जे पदार्थ ज्या स्वरूपाचे दिसतात त्याहून त्यांची भिन्न रूपे पाहणारे अनेक लोक या भूतलावर असतील. जडपदाथाचे बाह्यतः दिसणारे जडस्वरूप सत्य नसून त्यांचे खरे स्वरूप सूक्ष्म आहे, असें सिद्ध करण्याकडे पदार्थविज्ञानशास्त्राचा कल होऊ लागला आहे, हे आपणांस ठाऊक असेलच. असो. एकंदर विवेचनाचा मथितार्थ हा की, भौतिकशास्त्रांच्या भट्टींत तावून सुलाखून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचे सामर्थ्य कोणा धर्मात असेल तर तें वेदांतधर्मातच आहे. आपल्या सूक्ष्म विवेचकबुद्धीच्या कसोटीवर त्याला तुम्ही घांसलें तरीहि तें बावनकशी सुवर्णच आहे असें तुमच्या प्रत्ययास येईल. सर्वव्यापी तत्वाचा शोध अद्वैतमतानंच लाविला आहे. एकंदर पदार्थमात्रांतील चिरस्थायी तत्वाचा निश्चय दुसऱ्या कोणत्याहि मताने केलेला नाही. विश्वबाह्य परमेश्वराची कल्पना अत्यंत प्रखर अशा विवेचकबुद्धसि कधीहि मान्य होणार नाही. परमेश्वर विश्वबाह्य पटला की, त्यावर अनेक गुणांचा आरोप करावा लागणारच. कारण गुणांवांचून उत्पत्ति करणेच शक्य नाही. तो 'दयाळु आहे, पवित्र आहे ' इत्यादि अनेक गुणांचा आरोप त्याजवर करावा लागेल. पण दयाळु आणि पवित्र अशा परमेश्वराने उत्पन्न केलेल्या जगांत आम्हास पुण्य आणि पाप व सुख आणि दुःख इत्यादि द्वंद्वे दृष्टीस पडतात. आपणांस जें जें कांही बरे वाटते, त्या सर्वांची एक मूस तयार करून आपण परमेश्वरास बनवितों असाच 'विश्वबाह्य परमेश्वर' या कल्पनेचा अर्थ होईल! या दृष्टीने परमेश्वराची व्याख्या पूर्ण करावयाची म्हटले तर तो चोर नाही, तो दुष्ट नाही, तो आततायी नाही' असेंहि ह्मणावे लागेल. आपल्या दृष्टीने सद्गुण ह्मणून वाटणाऱ्या गुणांचा जर त्याजवर आरोप करावयाचा तर त्याबरोबरच दुर्गुणांचा बाधहि करणे आवश्यक नाहीं काय ? परमेश्वर विश्व बाह्य असून तो सद्गुणैक मूर्ति