पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२१३

आज अधिक दिसत आहे; पण एक दिवस असा येईल की आजचा पापमूर्ति जो मी तोच त्यादिवशी वंदनीय सत्पुरुष ह्मणवीन. कारण जें पूर्णरूप तुमच्यांत आहे तेच माझ्यांतहि ओतप्रोत भरून राहिले आहे. माझा दर्जा कमी कां आणि तुमचा अधिक कां, या प्रश्नास उत्तर देण्याकरितां विश्वबाह्य सैतानाची अथवा परमेश्वराची अपेक्षा करावी लागत नाही. वस्तुगत पदार्थातूनच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या पद्धतीनेच हे उत्तर आपणांस मिळालें आहे. विश्वांत जे जे काही दिसतें तें सर्व परमेश्वररूपच आहे. सर्व जड पदार्थातहि परमेश्वरच भरला आहे असे म्हटले, म्हणून परमेश्वर जडरूप आहे असे मात्र समजू नये; तर ज्या इंद्रियांच्या द्वारा आपण परमात्म्याचे रूप पाहतों, त्यांच्या दोषामुळे परमात्म्याचे स्वरूप जड आहेसें भासते, असे समजावें. परमात्मा वस्तुतः सर्वत्र एकसारखाच व्यक्त झाला असतांहि इंद्रियांच्या दोषांमुळे त्याच्या स्वरूपांत भिन्नता उत्पन्न होते. बाह्येद्रिये बंद करून केवळ मनाने त्याला अवलोकन केले तर तोहि मनोमयस्वरूपाचा दिसतो. मनाचाहि त्याग करून केवळ चैतन्यद्वारा त्याचा अनुभव घेतला तर तो केवळ चैतन्यरूप आहे असा अनुभव येतो. तो जडपदार्थ नाही, तर जडांतील सत्यांश तो आहे. आपण असें समजूं की, अर्धवट अंधार आहे अशा जागी मी गेलों तो समोर मला कांहीं पदार्थ दिसला. काडी ओढून पाहिली तों ती खुर्ची आहे, असा माझा निश्चय झाला. या उदाहरणांत ‘खुर्ची आहे' अशी प्रतीति होण्यास दोन कारणे लागतात. तेथे काही तरी असणे हे एक कारण; व प्रकाश उत्पन्न करून तो पदार्थ 'अमुक आहे' असा निश्चय करणे हे दुसरें कारण. पहिल्या कारणाने केवळ अस्तित्वाचा बोध होतो. हेच परमात्म्याचे रूप. दुसऱ्या कारणाने 'तें अमुक' असा मी निश्चय करतो. हे माझ्या इंद्रियद्वारा घडलें आहे ह्मणून तें परमात्म्याचें सत्यरूप नसून मी त्यावर नामरूपाचा आरोप केला असें होतें. अशाच रीतीने परमात्मस्वरूपावर अनेक प्रकारचे आरोप करून आपण खुर्ची, खोली, घर, जग, चंद्र, सूर्य आणि तारे इत्यादि पदार्थ इंद्रियद्वारा उत्पन्न करतो. 'मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना। मत्स्थानि सर्वभूतानि नचाहं तेष्ववस्थितः ॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभन्नच भूतस्थो ममात्मा भूत भावनः॥' अशी परमेश्वरस्वरूपाची व्याप्ति आहे. आतां येथे एक प्रश्न उपस्थित होण्याचा संभव आहे. तो प्रश्न असा की, आपणा सर्वांस अमुक पदार्थ , अमुक चंद्र आणि अमुक घर असा एकच बोध का होतो ? जर आपण आपल्या