पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२११

णारा मनुष्य आणि गटारांत लोळणारा सूक्ष्म जंतु हे भौतिकशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एकरूपच आहेत. दोघांतहि एकाच जातीच्या घटकांचा वास आहे असें भौतिकशास्त्रे त्या गर्विष्ठ मनुष्यास निक्षून सांगत आहेत. आह्मी पौवात्य शास्त्रज्ञ यापढेंहि आणखी एक पाऊल टाकून असें ह्मणतों की तो गर्विष्ठ मनुष्य एकेकाळी च्या रूपाने खरोखरच गटारांत लोळत होता. आणि त्यानंतर दुसरे अनेक जन्म घेऊन तो सध्या मनुष्य झाला आहे. जगांत जें जें दृश्यास आले आहे त्या सर्वांचें एकस्वरूप पाहणे, किंबहुना आपण स्वतःच इतक्या अनंतरूपाने नटलो आहों, हा अनुभव घेणे ही मानवी ज्ञानाची परमावधि आहे. आपणा सर्वांना शिकण्यासारखें जें कांही आहे ते हेच. आपला गर्व नेहमी अशा अनुभवाच्या आड येत असतो. एखाद्या मोठ्या मनुष्याची व आपली योग्यता एकच आहे असें ह्मणवून घेणे आपणांस भूषणास्पद वाटते; पण आपले साम्य किड्याशी आहे असे कोणी ह्मटल्याबरोबर आपणांस क्रोध येतो. मनुष्याचे भयंकर अज्ञान त्याच्या स्वतःच्या उन्नतीच्या प्रत्येक मार्गात आडवें पडून त्यास पुढे पाऊल टाकू देत नाही. आपला एखादा पूर्वज श्रीमान् असला तर आपण अमक्या श्रीमानाचे खापरपणतू असें लोकांना सांगण्यांत आपणांस भूषण वाटते. त्याने तो पैसा चोऱ्या करून अथवा दरवडे घालून मिळविला असला तरी त्याच्या कौशल्याची आणि धाडसाची आपण तारीफ करीत सुटतो. पण आपला पूर्वज एखादा नीतिमान् पण भिकारी मनुष्य असला तर त्याच्या नांवाशी आपला काही संबंध नाही असे दाखविणे आपणांस भूषणरूप वाटते.

 भौतिकशास्त्रांचा जो जो उत्कर्ष होत जाईल तो तों आमच्या डोळ्यांवरचें एक एक पटल गळून पडेल यांत संशय नाही. सत्य आपला मार्ग, हळू हळू पण निश्चयाने, आक्रमूं लागले आहे. सनातनधमांच्या दृष्टीने हा मोठा विजयच आहे. आज कित्येक शतकें हीच गोष्ट आमचा अद्वैत सिद्धांत सर्व जगास सांगत आहे. माझ्या आत्म्याचें जें मूलरूप तेंच वस्तुतः सर्व विश्वाचे रूप आहे; येवढेच नव्हे तर सर्व पदार्थ मूलतः एकरूपच आहेत व दृश्याभासामुळे ते वेगळे आहेत असे दिसते, हेच अद्वैतसिद्धांताचे सांगणे आहे. आमचा अद्वैतसिद्धांत प्रत्येकाला ह्मणतो 'तत्वमसि' 'तेंच तूं आहेस.' तूं विश्वापासून आपणास निराळा समजून दुःख भोगतोस. तुला सुखरूप व्हावे असे वाटत असेल तर या एकतानतेचा अनुभव घे. ज्याला या एकात्मकतेचा अखंड अनुभव असेल त्यालाच अखंड सुखाची प्राप्ति होईल.