पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२०९

असा एखादा धर्म असला तर भौतिकशास्त्रांच्या माऱ्याने त्याची इमारत मोडकळीस येणार नाही; एवढेच नव्हे, तर उलट तिला दुजोरा मात्र मिळेल. वेदांत धर्माने वरील दोन्ही अटी पाळून आपला मार्ग काढिला आहे असे आढळून येते. सनातनधर्मात 'ब्रह्म' ह्मणून जे सांगितले आहे, तेंच भौतिकशास्त्रे आज सिद्ध करूं पाहत आहेत. अनेक प्रकारच्या कारणकार्यपरंपरांचा शोध करतां करतां आपणांस 'ब्रह्म' हेच शेवटचे कारण सांपडते. तें गुणविशिष्ट नाही. तें अमुक असे दाखवितां येत नाही अथवा पाहतांहि येत नाही. तें गुणातीत आहे. त्यामुळे फार तर, त्याला ' अस्तित्व' इतकीच संज्ञा लावितां येईल. अस्तित्वाची कल्पना आली की तिजबरोबर प्रकाशरूप ज्ञानाची व आनंदाची कल्पना आलीच. ह्मणून 'ब्रह्म' याची व्याख्या 'सच्चिदानंद' एवढीच आहे. जगांत दृष्टीस पडणाऱ्या सर्व पदार्थास नाम-रूप आहे. हे नाम-रूप नष्ट झालें तरी त्यांचे अस्तित्व राहील असें भौतिकशास्त्रांनी सिद्ध केले आहे. कोणत्याही वस्तूचा संपूर्ण नाश कधीच होत नसून (nothing is lost) फक्त रूपांतर मात्र होते. यामुळे दृश्य रूप नष्ट झाले, तरी अस्तित्व राहणारच हे उघड आहे. या अस्तित्वाला 'अमुक प्रकारचे अस्तित्व' अशा प्रकारची कांहीं संज्ञाहि देतां येणार नाही. अशा प्रकारच्या केवलस्वरूपाच्या अस्तित्वापलीकडे आपल्या मनाची धांव जाऊ शकत नाही. अस्तित्वाच्या कल्पनेची ही शेवटली पायरी होय. ब्रह्म याचे दुसरें स्वरूप ज्ञान हे आहे. येथे ज्ञान या शब्दानें आपलें सामान्य व्यावहारिक ज्ञान असा बोध होत नाही हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. ज्ञान ह्मणजे अस्तित्वाची जाणीव होण्यापुरतें चैतन्य एवढेच समजावयाचें. ज्याप्रमाणे केवलस्वरूपाचे अस्तित्व गुणातीत-किंबहुना कल्पनातीत-आहे, त्याचप्रमाणे केवलस्वरूपाचे ज्ञान अथवा चैतन्यहि कल्पनातीत आहे. विश्वांतील वस्तूंत अनंत भेद दिसत असतांहि त्यांच्या अंतर्यामी अस्तित्वाची आणि चैतन्याची एकतानता आहे हे आपल्या प्रत्ययास येते. वस्तूंत अनेक रूपांतरे झाली तरी ती नष्ट होत नाही, असा सिद्धांत असल्यामुळे अस्तित्वाची आणि चैतन्याची एकतानता आपोआपच सिद्ध होते. वस्तूंचे रूपांतर झाले तरी तो फरक केवळ बाह्यतः होणारा असल्यामुळे अंतस्थ चैतन्य आणि अस्तित्व यांस बाध येत नाही. अनेक प्रकारची भौतिकशास्त्रे एकच गोष्ट निरनिराळ्या प्रकारांनी सिद्ध करीत आहेत. ती ही की, आपण सर्व चैतन्याने, मनाने व शरीरानेंहि एकच आहों! आपण शरीरानेंहि एकच आहों, हे ह्मणणे आरंभी हास्यास्पद वाटेल; पण तसे वाटणेस्वा. वि. १४