पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२०७

ह्मणतो, त्याची शास्त्रीय व्याख्या काय आहे, याचा तुह्मांस उलगडा झालाच असेल. धर्मशास्त्रालाहि हीच कसोटी लावून त्याचे प्रामाण्य सिद्ध करा, असे आव्हान अर्वाचीन जग आह्मांस करूं लागले आहे. धर्मशास्त्राला जगण्याची इच्छा असेल तर त्याने या आव्हानाचा आनंदाने स्वीकार करून त्यास प्रत्युत्तर दिले पाहिजे. आजपर्यंत धर्मशास्त्राने या आव्हानाची निवळ अवहेलना केल्यामुळेच सांप्रतची दुर्दशा त्यास प्राप्त झाली आहे. भौतिकशास्त्रांच्या प्रचंड तोफखान्याने त्याच्या किल्ल्यास जागोजाग मोठाली खिंडार पाडली आहेत. क्रियागत अथवा पदार्थगत कारणे शोधून काढून त्यांची उपपत्ति लावण्याकडे प्रत्येक भौतिकशास्त्राचा कल असतां धर्मशास्त्राने मात्र या मार्गाची उपेक्षा केली. धर्मशास्त्राचा अगदी आरंभापासूनचा इतिहास पाहिला तर जगच्चालक ह्मणून एक सर्व शक्तिमान् प्राणी या विश्वाच्या बाहेर राहून विश्वकार्य करतो, ही कल्पना अगदी जुन्या काळापासून रूढ झाल्याचे आढळून येते. विश्वाच्या बाहेर राहून केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीने विश्व निर्माण करून त्याचे नियमन करणारा कोणी तरी आहे, असे मानल्यावांचून अनेक प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागतच नाही, अशा प्रकारच्या सिद्धांताचें चर्वितचर्वण धर्मशास्त्र आजपर्यंत करीत आले आहे. हा सिद्धांत सांगण्याचे प्रकार अनेक असतील, तथापि हाच सिद्धांत पुन:पुन: सांगण्याचा धर्मशास्त्राचा हट्ट आहे. यानंतर, विश्वाबाहेर राहून विश्वाचे नियमन करणाऱ्या या परमेश्वरावर दुसऱ्याही कांहीं गुणांचा आरोप करण्यांत आला. तो परमदयाळू आहे असेंहि सांगण्यांत येऊ लागले; पण तो दयाळू असतांहि दुःख आणि असमता यांचा वास जगांत असल्याचे प्रत्येकक्षणी आपल्या अनुभवास येते. धर्मशास्त्राचे सोपपत्तिक विवेचन करूं पाहणाऱ्या तत्वज्ञाचा असल्या प्रकारच्या गोष्टींशी वास्तविक कांही संबंध असण्याचे कारण नाही; पण विश्वबाह्य परमेश्वराची कल्पना प्रथमपासूनच त्याच्या चित्तावर ठसविली गेली असल्यामुळे असमता वस्तुगत असून परमेश्वराकडे तिचा दोष नाहीं असें तो ह्मणूं लागला. पण या उत्तरानेंहि समाधान होण्यासारखें नाहीं हे उघड आहे. जर प्रत्येक वस्तु परमेश्वरानेच निर्माण केली आणि जर तो दयाळू आहे, तर असमता आणि तज्जन्य दु:ख यांची उत्पत्ति कां व्हावी, हा प्रश्न शिल्लकच राहतो. या विश्वाचें मूळ कारण काय ? या प्रश्नाला ईश्वराची मर्जी असे उत्तर तो देऊ लागला. परमेश्वराचे वास्तव्य कोठे आहे, हा प्रश्न येथे आपोआपच उपस्थित होतो. त्याला त्याचे उत्तर असें आहे की, तो विश्वाच्या बाहेर राहून विश्व चालवितो ! झाडावरून सुटलेले फळ कां पडलें, या प्रश्नाला