पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

क्रिया सुरू होते. तिच्याशी सदृश अशी वस्तु लवकर सांपडली की आपलें समाधान होते व ती पाहिलेली वस्तु अमुक आहे, असे ज्ञान आपणांस झाले असें आपण ह्मणतो. परंतु तिच्याशी सदृश अशी वस्तु आपल्या मनांत लवकर सांपडली नाही ह्मणजे आपले चित्त क्षुब्ध होते व ती वस्तु सांपडेपर्यंत आपणांस खरें समाधान प्राप्त होत नाही. अशावेळी आपल्या मनाचा कोनाकोंपरा धुंडाळण्याची आपली क्रिया चालू असते व जरूरीची वस्तु मिळाल्याबरोबर आपलें समाधान होतें. ज्ञान होणे ह्मणजे बाह्यवस्तूशी सदृश अशी वस्तु आपल्या चित्तांत सांपडणें असें आहे, हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच.ज्ञान होणे या क्रियेचे आणखीहि 'एक स्वरूप आहे. आकाशांत मेघांचा गडगडाट झाला ह्मणजे त्याचे कारण विचारले तर मुलें ह्मणतात 'ह्मातारी हरभरे भरडते' किंवा 'लढाई करणारे राक्षस आरोळ्या मारतात.' परंतु हे उत्तर बालबुद्धीसच शोभणारे आहे, हे उघड आहे. कोणतीहि क्रिया घडली तर तिचा संबंध दृश्य कर्त्याशी जोडल्याशिवाय बालबुद्धीचे समाधान होत नाही. कोणत्याहि क्रियेचे एखादें अंतर्वर्ती कारण असू शकेल ही गोष्ट अल्पबुद्धीच्या लक्ष्यांत न आल्यामुळे त्या क्रियेचे कारण एखाद्या प्रत्यक्ष कर्त्याकडे जोडण्याचा कल होतो.परंतु बुद्धीची प्रगल्भता वाढत गेली ह्मणजे अशा प्रकारच्या कारणकार्यांनी तिचे समाधान होणे शक्य नसते. प्रत्येक क्रियेचे कारण बाह्य कर्त्याकडे नसून ते त्या क्रियेतच असते व तें शोधून काढीपर्यंत प्रगल्भबुद्धीचे समाधान होत नाही. झाडावरून सुटलेले फळ खाली कां पडले याचे उत्तर 'अदृश्य राक्षसाने तें खाली ओढले' असे दिले असते तर तेवढ्याने न्यूटनच्या प्रगल्भबुद्धीचे समाधान होणे शक्य नव्हते. यामुळे त्याचे कारण त्या फळांतच कोठे तरी शोधण्याकडे तिची प्रवृत्ति आपोआपच झाली. दुसऱ्या पदार्थास ओढण्याची शक्ति प्रत्येक पदार्थात असते हे अंतर्वर्ती कारण सांपडतांच न्यूटनच्या प्रगल्भबुद्धा समाधान झाले. यावरून ज्ञान ह्मणजे क्रियेचें अंतर्गत कारण शोधून काढण अस आहे. भौतिकशास्त्रांची सर्व वाढ याच व्याख्येस अनुसरून झाला आहे. पदार्थाचे पृथक्करण करून त्यांचे मूलरूप शोधून काढण्याच्या प्रयत्नात एखाद्या रसायनशास्त्रज्ञाला राक्षसाचे किंवा भुताचें साहाय्य घ्यावे लागत नाही. त्याचे सर्व लक्ष्य वस्तुगत कारणे शोधण्याकडे वेधलेले असते. अनेक प्रकारांनी दृश्यमान होणाऱ्या शक्तीच्या क्रियांची कारणे. पदार्थविज्ञानशास्त्री त्या क्रियांतूनच शोधून काढतो. त्याला बाह्य कारणे अथवा उपकरणे शोधण्याचे कारण पडत नाही. यावरून आपल्या चिकित्सकबुद्धीचे समाधान ज्ञानाने होते, असे आपण