पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२०५

इतक्या जलद होते की, तिचे निरनिराळे दुवे आपल्या लक्ष्यांत येत नाहीत. परंतु एखादा ताडमाडाइतका उंच अथवा अत्यंत ठेंगणा असा मनुष्य आपण पाहिला तर आपणांस एकदम हंसू येते; याचे कारण काय ? याचे कारण इतकेंच की मनुष्यप्राण्याची जी प्रतिमा आपण आपल्या चित्तांत दुसरी अनेक मनुष्य पाहून ठरविली होती, त्या प्रतिमेशी विसदृश असें स्वरूप पाहिल्याबरोबर तें नियमाविरुद्ध वाटून आपणांस हंसू येते. अशा रीतीने एका गोष्टीचें. प्रामाण्य अनेक गोष्टींवरून, व त्या अनेक गोष्टींचे प्रामाण्य त्यांहून कित्येक पटीने अधिक गोष्टींवरून आपण ठरवीत असतों व हे क्षेत्र अत्यंत वाढून शेवटी आपण विश्वव्यापी नियमांची रचना करतो. आपल्या मनांत ही क्रिया सदोदित चालू असते. अशाच रीतीने अनंत अस्तित्वाची कल्पना आपल्या चित्तांत ग्रथित झाली आहे. विश्वाच्या अस्तित्वाची कल्पना ही आपल्या कल्पनाशक्तीची परमावधि आहे. आपण एका मनुष्याविषयी कल्पना केली की, तो विशिष्ट मनुष्य मनुष्यजातीच्या समष्टीपैकी एक व्यष्टी आहे, अशी कल्पना आपल्या मनांत येते. मनुष्य, मांजर आणि कुत्रे अशा निरनिराळ्या जातींच्या व्यष्टींविषयी विचार आपल्या मनांत आला ह्मणजे समष्टीविषयींची आपली पूर्वीची कल्पना अधिक विस्तृत होऊन एकंदर सचेतन प्राणिजातीच्या समष्टीपैकी या व्यष्टि आहेत असे आपण मनांत ठरवीत असतो. एका मनुष्याविषयी विचार करतांना केवळ मनुष्यजातीची समष्टि आपल्या चित्तांत होती, तीच विस्तृत होऊन एकंदर सचेतन प्राणीवर्ग ही समष्टि झाली. आतां मनुष्य, मांजर, कुत्रे आणि झाड यांविषयी विचार येतांच सचेतन आणि अचेतन अशा जीवांची कल्पना चित्तांत उद्भूत होऊन आपल्या चित्तांतील समष्टि पूर्वीहूनही अधिक विस्तृत होते. हे सर्व प्राणी आणि यांजबरोबरच इतर जडपदार्थांची कल्पना आपल्या चित्तांत येतांच आपली समष्टीची कल्पना अत्यंत विस्तार पावून ती विश्वरूप होते. या एकंदर विवेचनावरून मुख्य ध्यानात ठेवण्याचा मुद्दा हा की, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी आपण विचार करू लागलों की, तिजशी सदृश अशा आपल्या चित्तांतील अनेक गोष्टींशी तिची आपण तुलना करीत असतो. एखाद्या कपाटाला ज्याप्रमाणे अनेक लहान लहान खण असतात व त्यांत ज्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या वस्तु सांठविलेल्या असतात, त्याच प्रमाणे आपलें मन जणूं एक विश्वव्यापी कपाट असून त्यांत अनेक प्रकारच्या चिजा आपण सांठवून ठेविल्या आहेत. बाह्य जगांतील एखादी गोष्ट पाहून तिजविषयी विचार आपल्या चित्तांत उद्भूत झाल्याबरोबर हे खण उघडून तुलनेची