पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

अशी इच्छा करीत असतो. यासाठी धर्मशास्त्राचे प्रामाण्यहि आपल्या विवेचकबुद्धीस अनुसरून ठरविणे हे हानिकारक नाही.

 आतां तारतम्य बुद्धि ह्मणजे काय, हे प्रथम पाहिले पाहिजे. भौतिकशास्त्रांच्या शोधांमुळे व्यवहारामध्ये ज्या सिद्धांतांचा प्रत्यक्ष अनुभव आपणांस होतो त्याच सिद्धांतांनी धर्मशास्त्राच्या सिद्धांतांचे प्रामाण्य ठरविणे, असा तारतम्यबुद्धीचा अर्थ अलीकडच्या सुशिक्षित स्त्रीपुरुषांस मान्य झाला आहे. हाच अर्थ मान्य करून आपण पुढे विचार करूं. कोणतीहि एखादी गोष्ट घडली तर ती तशी कां घडली, याचा विचार आपण करूं लागलों ह्मणजे तशाच प्रकारच्या दुसऱ्या अनेक कार्याशी ती विशिष्ट गोष्ट आपण आपल्या मनांत ताडून पाहतो. या अमुक कारणे ह्मणून आपल्या बुद्धीचा पूर्वीच निश्चय झालेला असतो. त्याप्रकारच्या कारणांशी सदृश असे एखादें कारण, विचारार्थ हाती घेतलेल्या गोष्टीच्या मुळाशी आढळले तर आपलें समाधान होते. ह्मणजे अमुक कारणामुळे अमुक गोष्ट घडली, असा आपल्या तारतम्यबुद्धीचा निश्चय झाला, की आपलें समाधान होते. एका गोष्टीचा कार्यकारणभाव, तिच्याशी सदृश अशा दुसऱ्या अनेक गोष्टींवरून आपण ठरवितो. अशाच रीतीने हे विचाराचे क्षेत्र वाढवून, आपण अमुक नियम विश्वव्यापी आहे असें ह्मणतो. अशा अनेक प्रकारच्या कार्यपरंपरा पुन:पुन: पाहून त्यांवरून आपण जे नियम आपल्या मनांत बांधून ठेविले आहेत, त्यांस अनुसरूनच एखादी विशिष्ट गोष्ट घडली असें आपणांस समजलें ह्मणजे आपलें समाधान होतें. एखादी गोष्ट घडलेली आपण पाहिली, व ती आपल्या चित्तांत ठरविलेल्या नियमांस अनुसरून घडली नाही असें आपणांस वाटत असतें तोपर्यंत आपल्या चित्तांत असमाधान असते; परंतु ती गोष्ट पूर्वीच्या अनेक गोष्टींस विसदृश नाही, असे आपणांस कोणी दाखवितांच आपलें समाधान होतें. झाडावरून सुटलेले एक फळ खाली पडतांना पाहून न्यूटनचे चित्त बावरलें; पण प्रत्येक निराधार वस्तु पृथ्वीवर पडते हे त्याच्या लक्ष्यांत आल्याबरोबर प्रत्येक निराधार वस्तूस पृथ्वी आपल्याकडे ओढते, हा नियम आहे असें तो ह्मणूं लागला. असे होणे हा नियम आहे-- कायदा आहे, असे त्यास वाटल्याबरोबर त्याचे समाधान झाले. मानवीज्ञानाचे हे एक तत्वच आहे. रस्त्यांत एखादा मनुष्य मी पाहिला ह्मणजे एकंदर मनुप्यजातीशी त्याचे साम्य मी आपल्या चित्तांत ताडून पाहतो आणि ही व्यक्ति मनुष्य आहे असा माझ्या चित्ताचा निश्चय होतो. रोजच्या संवयीने ही क्रिया