पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२०३

प्रश्न आहे. या ठिकाणी त्या दोघांचा परस्परांच्या धर्मपुस्तकांवर विश्वास नसल्यामुळे पुस्तकांचे वचन निरुपयोगी होतें. ह्मणजे या वादाचा निकाल लावण्याचे काम दोघांच्याहि विवेचकबुद्धीकडे आपोआप येते. यावरून एक गोष्ट निःसंशय सिद्ध होते, ती ही की, कोणत्याहि धर्मपुस्तकांपेक्षा अधिक बलवान् अशी शक्ति असून तिचा निकाल आपणा सर्वांस मान्य होण्यासारखा असतो. एखाद्या धर्मपुस्तकावर आपला विश्वास नसला तरी त्यांतली एखादी गोष्ट आपल्या विवेचकबुद्धीस पटली ह्मणजे आपण निमूटपणे ती मान्य करतो. वस्तुतः ज्याला आपण विश्वास असें ह्मणतो तोहि विवेचकबुद्धीच्या संमतीनेच उत्पन्न झालेला असतो; मग ही वस्तुस्थिति आपल्या लक्ष्यांत आली असो अथवा नसो. आतां येथे एक प्रश्न उद्भवतो, तो असा की, दोन महात्म्यांनी दोन निरनिराळी अथवा विरोधी वचनें सांगितली असता त्यांचे परीक्षण करून त्यांत बरें वाईट ठरविण्याचे सामर्थ्य आमच्या तारतम्यबुद्धीस आहे की काय ? त्याचप्रमाणे धर्मासारख्या केवळ इंद्रियातीत शास्त्राची परीक्षा करण्याचे सामर्थ्य तिला आहे की काय ? आमच्या तारतम्यबुद्धीला जर हे सामर्थ्य नसेल तर अनेक धर्ममतांच्या भांडणांत शेवटला निकाल देण्याचे तिच्याने होणार नाही. एवढेच नव्हे, तर या निरनिराळ्या धर्ममार्गाची कधी काली तरी एकवाक्यता होईल ही आशाच नको. धर्मशास्त्रांची सत्यता आमच्या तारतम्यबुद्धीने पटण्यासारखी नसेल तर धर्मशास्त्रे ह्मणजे वेड्याची बडबड आणि भाराभर खोट्यानाट्या गोष्टींचे गाबाळग्रंथ याहून त्यांची काही अधिक किंमत आपणांस वाटणार नाही.

 मानवी अंतःकरणाच्या विकासाचे धर्म हे फळ आहे. ज्याप्रमाणाने अंतःकरण विकास पावू लागले त्याप्रमाणाने धर्ममार्ग रूढ होत गेले. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे धर्माचे प्रामाण्य पुस्तकांवरून ठरवावयाचे नसून अंत:करणाने ठरवावयाचे आहे. पुस्तकें ही मनुष्यांच्या अंतर्वृत्तींच्या विकासाची, दृश्य स्वरूपें होत. मनुष्याच्या अंतःकरणाची वाढ पुस्तकांस अनुसरून होत नाही. तर अंत:करणाच्या वाढीस अनुसरून पुस्तकें निर्माण झाली आहेत. मानवी अंत:करणाची वाढ हे कारण, आणि ग्रंथ हे कार्य आहे. स्वतः कारणरूप होऊन अंत:करणाचा विकास हें कार्य करणारे ग्रंथ निर्माण झाले नाहीत. ज्याप्रमाणे ग्रंथ, हे मानवी अंत:करणाच्या विकासाचे कार्य आहे, त्याप्रमाणेच विवेचकबुद्धि ही सुद्धा त्याच अंत:करणाच्या विकासाचे कार्य आहे. यामुळेच, समजून अथवा न समजताहि, आपण आपली कृति आपल्या तारतम्यबुद्धीस अनुसरून असावी.