पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८]

मुळे त्यांच्या परस्परविरोधी स्वरूपाकडे त्यांचे चित्त वेधले. परस्परविरुद्ध अशा या संस्कृतीत सत्य कोणती याचा विचार मनांत आल्यावर त्यांची बुद्धि आपोआप जागृत होऊन विचारमालिकेस सुरवात झाली. विवेचकबुद्धीचे पूर्ण समाधान होईपर्यंत मध्यंतरी कोठेहि विसावा न घेतां सशास्त्र पद्धतीने या दोन्ही संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला. या मार्गाचें अंतिम पर्यवसान अद्वैतमतांत झाले. पूर्वकालीन ऋषींना तरी अद्वैतसिद्धांत कांही अगम्य रीतीने अथवा केवळ दैववशात् प्राप्त झाला होता असे नाही. त्याकरितां त्यांनाहि आपल्या बुद्धीस आटोकाट ताण द्यावा लागला होता.
  ज्या अद्वैताची सिद्धि बुद्धीने केली होती, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप नरेंद्रास (विवेकानंदाचें पूर्वाश्रमीचें नांव ) दक्षिणेश्वराच्या देवालयांतील उद्यानांत दिसले. पूर्वकालीन ऋषींनी सांगितलेलें व बुद्धीनें कबूल केलेलें रूप भगवान् श्रीरामकृष्ण या विभूतींत अवतरलें आहे, अशी नरेंद्राची खात्री झाली. ज्याचें परोक्ष वर्णन ग्रंथांनी केलें तें रूप त्यांस प्रत्यक्षच दिसले. समाधि हाच ज्यांचा ज्ञानाजनांचा मार्ग व ज्यांचे भाषण ह्मणजे प्रत्यक्ष ज्ञानाचें व्यक्तरूप अशा श्रीरामकृष्णांचे त्यांस दर्शन झाले. त्यांच्या दर्शनाबरोबर परमात्मदर्शनाची उत्कंठा उद्भवली. क्षणक्षणा वाढणाऱ्या तापाप्रमाणे ती इच्छा बळावत गेली. ग्रंथांनांहि ज्याचे पूर्ण वर्णन करतां आले नाही त्या स्वरूपांत निमग्न असणाऱ्या श्रीरामकृष्णांस ग्रंथांत काय सांगितले आहे याची खबरहि नव्हती! श्रीरामकृष्णांच्या प्रसादाने मानवी जीविताचें रहस्य विवेकानंदांनी हस्तगत केले.

 पण इतक्यानेच त्यांच्या कार्याची पूर्वतयारी संपली नाही. यानंतर त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करून अनेक संतमहंत आणि श्रोत्रीय यांच्या भेटी घेतल्या. सामान्य मनुष्यांशीहि स्वामीजी अगदी बरोबरीच्या नात्याने वागत. सामान्य मनुष्यापासूनहि जे घेण्यासारखे दिसले, त्याचा त्यांनी संग्रह केला. परमहंस श्रीरामकृष्ण आणि इतर संत यांच्यापासून ज्याप्रमाणे भरतभूमीच्या प्राचीन स्वरूपाची माहिती त्यांस मिळाली त्याप्रमाणे सध्याच्या भरतभूमीची माहिती त्यांनी सामान्य जनांपासून मिळविली.

 अशा रीतीनें जें ज्ञान त्यांनी, शास्त्रे, सद्गुरु आणि प्रवास यांच्यायोगें प्राप्त करून घेतलें, तेंच त्यांनी जगास परत दिले. ज्ञानाच्या या त्रिविधरूपाची छाया त्यांच्या सर्व भाषणांत स्पष्ट उमटलेली आहे. या त्रिविधज्ञानापासून सर्व जगाचा ताप हरण करणारी दिव्य औषधि त्यांनी निर्माण केली. या तीन वातींनी जो