पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७]

होते. त्याचाच अनुवाद सशास्त्र पद्धतीने करून स्वामींनी या परस्परविरोधी दिसणाऱ्या मतांची एकवाक्यता केली हे विसरता कामा नये. स्वामींच्या प्रवचनांत जो नवीनपणा आहे, तो हाच.

 अशा रीतीने पौर्वात्य व पाश्चात्य आणि जुनें व नवें यांचा पूर्ण संधि करून भांडणाचें बीजच ज्यांनी दग्ध करून टाकले ते माझे सद्गुरु धन्य होत ! धर्ममंदिरावर हा कळसच त्यांनी उभारला असें कोण ह्मणणार नाही ? जर 'एकमेवा द्वितीयम् ' हे खरे आहे तर पूजनाचे सर्व मार्ग खरे आहेत, एवढेच नव्हे तर सर्व प्रकारची कर्मे आणि एकंदर जीवनक्रम हे सर्व पूजाविधिच आहेत असें ह्मणावयास काय हरकत आहे ? याकरितां अमुक कृत्य ऐहिक आणि अमुक पारलौकिक हा भेदसुद्धा खोटाच ह्मटला पाहिजे. कर्म करणे हा सुद्धा पूजाविधीच आहे. मनोजय हाच त्याग. सर्व मानवी जीवनक्रमच धर्मरूप आहे. सदैव कार्यमग्न राहणे हे जितके कठीण आहे, तितकेंच संन्यस्त होणें हेंहि आहे. दोहोंचेंहि अंतिम पर्यवसान एकच.

 ज्ञान आणि भक्ति यांपासून कर्म वेगळे नाही असें विवेकानंदांनी सांगितले त्याचे रहस्य हेच होय. परमेश्वराची भेट मठांत अथवा देवळांतच होते असें नाही; तर ती एखाद्या कारखान्यांत अथवा शेतांतील झोंपडीतहि होऊ शकते. परमेश्वराच्या सेवेत राहून जसा परमेश्वर भेटतो, तसाच तो मनुष्याच्या सेवेनेहि भेटतो. जनतेची सेवा तीच परमात्म्याचीहि सेवा होय. जनतेच्या सेवेकरितां लढणारा वीर आणि कोणाच्या स्तुतीचीहि अपेक्षा न करितां आपल्या उद्दिष्ट सिद्धीकरितां खटपट करणारा सामान्य मनुष्य यांची योग्यता स्वामींच्या दृष्टीने सारखीच आहे. आपणांस धार्मिक न ह्मणवितां खऱ्या सन्मार्गाने चालणारा मनुष्य आणि अत्यंत धार्मिक मनुष्य यांत योग्यतेच्या दृष्टीने फरक नाही, असें ते ह्मणत. 'सर्व भौतिकशास्त्रे, विद्या व धर्मशास्त्रे एकाच सत्याचा शोध करीत आहेत; पण हे बरोबर समजण्यास आपणांस अद्वैतसिद्धांत प्रथम नीट कळला पाहिजे, असें स्वामींनी एके ठिकाणी झटले आहे. त्यांच्या एक लेखांत व व्याख्यानांत याच तत्वाचा त्यांनी सर्वत्र अनुवाद केला आहे; किंबदना त्यांचे सर्व लेख व व्याख्याने या एकाच तत्वाच्या प्रतिपादनार्थ केलेल्या टीकाच आहेत असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाही.

 स्वामी विवेकानंद यांनी संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे चांगले अध्ययन केले होते. या दोन्ही संस्कृतींचा परिणाम स्वामीजींच्या मनावर एकदम झाल्या