पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

मिश्र झाले असेल तर तें मात्र विवेचकबुद्धीच्या भट्टीत जळून जाईल. भट्टी निवून गेली ह्मणजे तींत बावनकशी सोने मात्र उरेल. असें करण्यापासून धर्माची कोणत्याहि प्रकारची हानी नसून त्याचे स्वरूप अधिक उज्ज्वल मात्र होईल. पदार्थविज्ञान अथवा रसायनशास्त्र यांची सिद्धि जशी प्रत्यक्ष प्रमाणाने होते, त्याचप्रमाणे धर्महि प्रमाणसिद्ध शास्त्र होईल; एवढेच नव्हे, तर त्याची योग्यता भौतिकशास्त्रांहून निखालस वरच्या दरज्याची ठरेल. कर्मेंद्रियांपेक्षा ज्ञानेंद्रियांची योग्यता जशी निःसंशय अधिक आहे, त्याचप्रमाणे जड भौतिकशास्त्रांपेक्षां ज्ञानप्रधान धर्मशास्त्राची योग्यता आपोआपच अधिक ठरेल. भौतिकशास्त्रांची सिद्धि केवळ इंद्रियांच्याच आधारावर अवलंबून आहे; पण धर्मशास्त्राची सिद्धि त्यापलीकडे जाऊन तुमच्या अंतरात्म्याची भेट घेते, व ह्मणूनच त्या शास्त्राची सिद्धि अधिक योग्यतेची व अधिक आवश्यक आहे.

 विवेचकबुद्धीच्या ताजव्याने धर्म जोखणे मूर्खपणाचे आहे, असें ह्मणणाऱ्या लोकांस ते काय बोलतात, हे त्यांचे त्यांसच समजत नसते. आपण असे समजू की, एक ख्रिस्तानुयायी आणि एक मुसलमान यांजमध्ये धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल वाद झाला. ख्रिस्ती ह्मणतो, 'माझा धर्म खुद्द परमेश्वराने येशूस सांगितला.' मुसलमान ह्मणतो, 'माझाहि धर्म ईश्वरप्रणितच आहे.' यावर ख्रिस्ती ह्मणतो, 'तुझ्या धर्मपुस्तकांत कित्येक खोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्याला जुलमानेंहि मुसलमान करावे व तो मुसलमान न झाला तर त्यास ठार मारावें. त्याला मारणारा मुसलमान कितीहि पापी असला तरी त्याला स्वर्ग मिळेल, असें तुझ्या धर्मपुस्तकांत सांगितले आहे.' मुसलमान ह्मणतो,. 'माझ्या धर्मपुस्तकांत सांगितले ते बरोबर आहे.' ख्रिस्ती पुन्हां प्रत्युत्तर करतो, 'माझ्या धर्मपुस्तकांत तसे सांगितले नाही, त्या अर्थी ते खोटें आहे.' मुसलमान ह्मणतो, 'तुझ्या पुस्तकांत काय सांगितले आहे ते पाहण्याची मला गरज नाही. सर्व काफरांस ठार मारावें असें जे माझ्या पुस्तकांत सांगितले आहे, ते खोटें असें ह्मणण्यास तुला तरी काय अधिकार आहे ? तूं जसें ह्मणतोस की, ख्रिस्ताने सांगितले ते बरोबर, तसेंच मीहि ह्मणतों की, माझे पुस्तक अल्लाने लिहिले आहे ह्मणून ते बरोबर आहे. परंतु अशा प्रकारच्या प्रश्नोत्तराना त्या दोघांचेंहि समाधान न होतां ते परस्पर धर्माची तुलना करावयास पाहतात. कुराणांतील नीतितत्वें अधिक श्रेष्ठ की बायबलांतील तत्वें श्रेष्ठ याबद्दल त्यांच्यांत वाद सुरू होतो. पण या वादाचा निकाल कोणी लावावयाचा हा महत्वाचा