पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२०१

सांगितले ह्मणून, अथवा अमक्या तमक्या पुस्तकांत सांगितले आहे म्हणून त्यांच्या म्हणण्यावर मी आंधळ्यासारखा विश्वास कां ठेवावा ? दुसऱ्यांनी अमुक एक मत खरें मानले तरी तूं तें तसेंच मानले पाहिजेस असें नाही' असा वाद बुद्धीने सुरू केला म्हणजे तिच्या मालकाची अगदी त्रेधा उडते यांत नवल काय ? असा वादविवाद नेहमी उपस्थित होऊ लागला ह्मणजे सध्याचे लोक कंटाळून विचाराची दिशाच सोडून देतात. अमुक एक गोष्ट खरी मानावी, तर आपली बुद्धि आड येते; खोटी मानावी तर लोकांच्या उपहासाच्या भीतीने तसे करवत नाही. अशा प्रकारच्या दुहेरी पेंचांत सांपडलेला मनुष्य विचार करणेच टाकून देतो, आणि 'रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति' अशा रीतीची वागणूक करूं लागतो. यामुळे सांप्रतकाळी धार्मिक ह्मणून ह्मणविणाऱ्या लोकांत वस्तुतः उदासीनांची संख्या बरीच आहे. धार्मिक बाबींचा सांगोपांग विचार न करतां निष्काळजीपणाने वागल्यामुळे त्यांच्या अंगी धर्माबद्दल पक्की उदासीनता आली आहे. ही स्थिति अशीच राहिली तर धर्माची जुनी इमारत पाया पोकळ झाल्यामुळे, ढांसळून पडल्याशिवाय राहणार नाही. धर्ममार्गाने चालणे आपल्या हिताचे आहे अशी खात्री अंतःकरणपूर्वक न वाटेल तर धार्मिकपणाचे सोंग किती दिवस टिकेल ? आणि टिकलें तरी त्याचा उपयोग काय? ही स्थिति बदलण्यास काही उपाय योजणे अवश्य आहे. विवेचकबुद्धीच्या भट्टींत तावून घेऊन भौतिकशास्त्र ज्याप्रमाणे आपले सत्यत्व प्रत्यक्ष सिद्ध करतात, त्याप्रमाणे स्वतःचे खरेपण त्या भट्टींतून निघून सिद्ध करण्याची धर्मशास्त्राची तयारी आहे की नाही, हा सध्या मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे; आणि या प्रश्नाच्या समाधानकारक उत्तरावर धर्माचें पुढील अस्तित्व अवलंबून आहे. ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रांतील प्रत्येक सिद्धांताची सत्यता आपण प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध करतो, त्याचप्रमाणे धर्मप्रतिपादित सिद्धांतांची सत्यता सप्रमाण सिद्ध न होईल तर ते सिद्धांत. भोळेपणाने आणि भाविकपणाने खरे मानणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होणार असा सध्याचा काळ आहे. माझ्या मतें धर्मशास्त्राने हा मार्ग शक्य तितक्या लवकर स्वीकारावा हे बरें. बुद्धीच्या प्रखर भट्टीत तापविल्यामुळे जर धर्माचा नि:पात झाला, तर तो मुळांतच हिणकस होता, असें आपोआप सिद्ध होईल. असले हिणकस शास्त्र समूळ नाश पावले तर त्यांत नुकसान तरी काय आहे ? तें जितके लवकर नाश पावेल तितकें बरें, असे मला वाटते. धर्मशास्त्रांत जे काही सत्य असेल त्याचा नाश कधीहि आणि कशानेंहि होणार नाही. त्यांत कांही हीन द्रव्य