पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवेचकबुद्धि आणि धर्म.
[ इंग्लंडांतील व्याख्यान.]

 एकेवेळी नारदऋषी सनत्कुमार मुनींकडे गेले. आपणांस ज्ञान सांगण्याविषयी त्यांनी त्यांची प्रार्थना केली. 'आपलें अध्ययन यापूर्वी कोठपर्यंत झाले आहे ? असा प्रश्न सनत्कुमारांनी विचारल्यावर नारद ह्मणाले, 'मी वेदपठन केले आहे. ज्योतिषादि विद्यांचाहि अभ्यास मी केला आहे; परंतु माझ्या चित्ताची तळमळ अद्यापि शांत होत नाही.' सनत्कुमार ह्मणाले, 'नारदा, तूं आजपर्यंत ज्या विद्यांचे अध्ययन केलेंस, त्या सर्व विद्या फारशा महत्वाच्या नाहीत. सर्व लौकिक विद्या आणि शास्त्रे यांचे महत्व आमच्या दृष्टीने फारच कमी आहे. ज्या विद्येनें ब्रह्मानुभव होतो, तीच खरोखर विद्या या नांवाला पात्र आहे. तेंच खरें ज्ञान.' धार्मिकज्ञानाच्या महत्वाचे याप्रमाणे वर्णन केलेले सर्व धर्मात आपणांस आढळून येते. कोणत्याहि लौकिकविद्येपेक्षां धर्मज्ञान श्रेष्ठ आहे, असे उल्लेख सर्व धर्मग्रंथांत आढळून येतात. यामुळेच धर्मज्ञान इतर शास्त्रांपासून आजपर्यंत अलग राहिले आहे, एवढेच नव्हे, तर इतर शास्त्रांचे ज्ञान त्यापुढे निर्माल्यवत् आहे, असे सांगण्याचा परिपाठ पडला आहे. लौकिकशास्त्राचा विस्तार केवढाहि मोठा झाला, तरी तो व्यवहारमर्यादेच्या बाहेर जात नाही; परंतु व्यवहारापलीकडे नेऊन सत्याशी तुमची प्रत्यक्ष भेट घालावयाची असा धर्मशास्त्राचा बाणा असतो. धर्मशास्त्राचा हा अभिमान योग्य आहे; परंतु त्यामुळे एक मोठी वाईट गोष्ट झाली आहे. ती ही की, धर्मज्ञानाने लौकिकज्ञानास तुच्छता आणिली आहे. त्यामुळे धर्मप्रचारकांत इतर लौकिकविद्यांबद्दल तुच्छतादर्शक भाव उत्पन्न होतो; एवढेच नव्हे तर कोणत्याहि लौकिक विद्येने या प्रदेशाकडे ढुंकूनहि पाहूं नये व धर्म जें कांही सांगेल, त्याची प्रतीति लौकिकविद्येच्या मापानें न पाहतां तें खरें मानावें. असा धर्मप्रचारकांचा हट्ट असतो. लौकिकविद्येने एखाद्या सिद्धांताचे प्रतिपादन केले, तर त्यावर वाटेल तितकी भवति न भवति करण्याची परवानगी असते. आमच्या विचक्षकबुद्धीस तो सिद्धांत न पटला, तर तो कबूल केलाच पाहिजे असें नाही. परंतु धर्मसिद्धांताची गोष्ट याहून वेगळी आहे. धर्माने एखादा सिद्धांत प्रतिपादन केला तर त्यावर प्रश्न विचारण्याची सोय नाही. सर्व जगभर हीच प्रवृत्ति आजपर्यंत दिसून आली आहे. यामुळे नवीं भौतिकशास्त्रे व जुनी धर्म