पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

विराम पावतील. आजपर्यंत हजारोंनी परमेश्वराची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. तुमची इच्छा असेल तर तुह्मांलाहि तो भेटेल; परंतु हे होण्यास तुमची इंद्रियें अथवा मनोमयादि कोश हे मात्र तुमच्या उपयोगी पडणार नाहीत. या सर्वांच्या पलीकडे तुह्मांस गेले पाहिजे. हे काम विसरू नका, आणि मध्यंतरी कोठेहि थांबू नका. आजपर्यंत युगानुयुगें जी कर्मे आपण केली आहेत, ती पाशरूप होऊन आपणांस आपल्या मध्यबिंदूपासून लांब लांब ओढीत आहेत. यासाठी आतांपर्यत सांगितलेल्या मार्गाने आपण चालू लागलों ह्मणजे हे पाश हळू हळू ढिले पडतील आणि ते शेवटीं सर्वथा गळून पडले म्हणजे आपण ज्या ठिकाणी जाऊं तें ठिकाण आजपर्यंत कोणी जागेपणी, स्वप्नांत अथवा झोंपेंत पाहिलेले नसून तें या अवस्थात्रयाच्या पलीकडे आहे. अशा स्थितीत आपण विचित्र भाषा बोलूं लागतों; आणि जग त्याला वेड्याची बडबड, असें नांव देतें. कल्पनातीत तत्वाची कल्पना जगाला कोठून असणार ? कल्पनातीत झालेला मनुष्य जगाच्या दृष्टीला वेडा दिसावा यांत नवल नाही. जगांत जो जो प्राणी जन्मास आला आहे, त्या प्रत्येकाला ही स्थिति प्राप्त होण्यासारखी आहे. चिखलांत लोळणारा किडाहि ही स्थिति एखादे दिवशी प्राप्त करून घेईल. मुक्तीच्या मार्गात कोणालाहि मज्जाव नाही. प्रत्येकाला केव्हांना केव्हां ही यशःप्राप्ति होईलच होईल. कित्येक वेळां आपणांस जबर ठेचा लागतील आणि हातपाय मोडण्याचे प्रसंग येतील; पण शेवटी 'अहं ब्रह्मास्मि' असें ह्मणण्याची वेळ खास येईल. ज्या आपल्या मूळरूपापासून आपण निघालों आहों, त्या मूळरूपास आपणांस परत जावयाचे आहे. हा मार्ग अखंड मंडलाकार आहे. सरळ रेषेला केव्हांच शेवट येणे शक्य नाही हे आपणांस ठाऊकच आहे. यासाठी प्रत्येक प्राण्याची गति मंडलाकार आहे असा सिद्धांत आहे. मंडलाच्या एका बाजूला असतां एखादा प्राणी खालीं जातांना दिसला तरी तो दुसऱ्या बाजूस आल्यावर वर चढू लागतो. याकरितां खाली जाणे आणि वर येणे ही भाषा केवळ सापेक्ष आहे. मंडलाकार फिरणारा प्राणी वस्तुतः मागे अथवा पुढे जात नाही. ज्या बिंदूपासून त्याचा प्रवास सुरू झाला, त्याच बिंदूला पुन्हां येऊन मिळण्याची ती गति आहे. याकरितां सर्व एकाच प्रकाराने चालले असल्यामुळे हा क्षुद्र आणि तो मोठा असें ह्मणणे अशास्त्र नाही काय? ज्यापासून सर्व सृष्टि व्यक्त झाली, ज्याच्या अधिष्ठानावर तिचे अस्तित्व भासते आणि ज्याकडे ती परत जात आहे, तेंच परमेश्वराचे स्वरूप.