पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१९५

बुद्धीचे हत्यार सज्ज करावे लागते. स्वतःपुरतें ज्ञानवान् होण्यास बौद्धिक हत्याराची जरूर नाही.” 'ज्यांचे अंतःकरण पवित्र आहे ते धन्य होत, कारण ते परमेश्वरास भेटतील' असें बायबलांत सांगितले आहे. तुमचें अंतःकरण जागृत नसेल, तर जगांत निर्माण झालेली सर्व शास्त्रे तुमच्या जिभेवर असली तरी तुह्मांस मुक्तीची पाऊलवाटहि दिसावयाची नाही. जगांतल्या सर्व ग्रंथांचा ढीग करून त्यांत तुह्मीं स्वतःस पुरून घेतले, तरी त्यांचा तुह्मांस यत्किंचित्हि उपयोग होणार नाही. अंतःकरणाने दाखविलेल्या मार्गाने तुह्मी नीट गेला तर योग्य ठिकाणी तुह्मी बरोबर पोहोंचाल. बुद्धीला स्वप्नांतहि आढळून न येणाऱ्या गोष्टी अंतःकरणाला दिसतात. यासाठी जी गोष्ट करावीसें अंतःकरणपूर्वक तुह्मांस वाटेल ती बिनदिक्कत करीत जा. त्याठिकाणी तसे करण्यास तुमची तारतम्य बुद्धि आड आली तर तिच्या नादी लागू नका. एखादें परोपकाराचे कृत्य करावें असें अंतःकरणपूर्वक वाटले, की बुद्धि पुष्कळ वेळां त्याच्या आड येते. असें करण्याने अमक्याची मर्जी मोडेल, तमका रागावेल आणि तिसऱ्याला वाईट वाटेल असल्या गोष्टी तुमची बुद्धि तुम्हास सांगू लागते. पण असल्या गोष्टींना तुह्मी आपले कान बहिरे करा. अंतःकरणदर्शित मार्गाने तुह्मी गेलां, तर खरोखर तुमच्या हातून चुका अशा फारच थोड्या होतील. पवित्र अंत:करण निर्मळ आरशासारखे आहे. निर्मळ आरशांत ज्याप्रमाणे कोणत्याहि वस्तूचे योग्य प्रतिबिंब पडते, त्याच प्रमाणे शुद्ध अंतःकरणांत परमेश्वराचे प्रतिबिंब यथास्थित उतरतें. आतांपर्यंत जे अनेकविध उपाय सांगितले, ते चित्तशुद्धीसाठीच होत. अंतःकरण शुद्ध झालें की त्यांत त्याचक्षणी परमेश्वराचे प्रतिबिंब दिसू . एकंदर विश्वांत सत्यस्वरूप ह्मणून जें कांही असेल त्याचा उदय शुद्ध अंतःकरत ताबडतोब होतो.

 विश्वांतील वस्तु ज्या अणु-परमाणूंपासून बनल्या आहेत आणि ज्या नियमांन्वयें हे विश्व चालते, त्याचा शोध कित्येक युगांपूर्वी ज्यांनी लाविला, त्यांनी दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शकयंत्र डोळ्यांनी पाहिलेंहि नव्हते. रसायनशाला ह्मणजे काय, हे त्यांस स्वप्नांतहि कधी कळले नाही. असे असतां त्यांनी हे सर्व शोध कशाच्या मदतीने लावले ? त्यांच्या शुद्ध अंतःकरणांत परमेश्वराचा उदय झाल्यामुळे त्यांस अगम्य असें कांहींच राहिले नाही. त्यांनी आपली अंतःकरणें शुद्ध केली होती. बुद्धीच्या वाढीसाठी त्यांनी खटपट केली नाही. तेंच करणे आपणांस आज अशक्य आहे काय? जगांत सुखाचा दिवस कधी काळी उगवणार असेल तर तो बुद्धिवर्धनाने खचित उगवणारा नसून अंतःकरणशुद्धीनेच उगवणारा आहे.