पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

झाली, की, ती प्रेमावर हत्यार धरते. बुद्धीचे काम फक्त निवडानिवड करण्याचे आहे. अंतःकरणाचे काम बुद्धीपलीकडे जाऊन परमेश्वराची भेट घेण्याचे आहे. यावर असा एक प्रश्न उपस्थित होण्याचा संभव आहे की, बुद्धिमत्तेचें तेज आमच्या हरघडी प्रत्ययास येते, आणि अंतःकरणाचे येत नाही. असा आमचा अनुभव असतां तुमचे ह्मणणे आह्मीं कां कबूल करावें ? याचे उत्तर असें आहे की, बुद्धि रजोगुणप्रधान असल्यामुळे तिचे तेज अधिक उघड असते. अंत:करण सात्विक असल्यामुळे त्याचा प्रत्यय अंतर्वर्ती असतो. हा प्रत्यय इतरांस न आला तरी ज्याचा त्यास अनुभवाने समजतो. दुसरे असे की, अंत:करणाच्या बाल्यदशेत त्याचे गुण झांकल्यासारखे असतात. पण तेच आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशू लागले, की, आपणा सर्वांच्या उघड प्रत्ययासहि येते. आजपर्यंतचे साधू पुरुष पाहिले तर त्यांच्यांत बुद्धीपेक्षां अंतःकरणाचीच वाढ नि:संशय अधिक दिसून येईल. सारे जग ज्यांनी प्रकाशमान करून सोडले, त्यांनी तें बुद्धीच्या बळावर केलें की अंतःकरणाच्या बळावर केलें, याचा आपल्या मनाशी विचार करा. अत्यंत बुद्धिमान् मनुष्य एखादें भयंकर कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाही; पण अंत:करणाची जागृति ज्याला प्राप्त झाली आहे, त्याच्या हातून कोणतेंहि वाईट कृत्य आजपर्यंत कधीही झालेले नाही. यासाठी परमेश्वरप्राप्ति आपणांस हवी असेल तर बुद्धीच्या वाढीपेक्षां अंतःकरणाची वाढ करण्याकडे आपण अधिक लक्ष्य पुरविले पाहिजे. आपणांस शेवटी जी स्थिति प्राप्त करून घ्यावयाची ती बुद्धीनें प्राप्त होणारी नसून अंतःकरणाने प्राप्त होणारी आहे, हे नित्य लक्ष्यांत बाळगलें पाहिजे. हे विश्वरूपी दूध आपण आपल्या रवीने घुसळीत आहों. आपले ज्ञान, बुद्धि, तारतम्यज्ञान आणि अंतःकरण ही रवीच्या पाकळ्यांसारखी आहेत. हे दुध घुसळतां घुसळतां त्यांतून शेवटीं परमेश्वररूपी लोणी निघतें, तें अंतःकरणास चिकठून खाली राहिलेलें ताकाचे पाणी बुद्धीसाठी शिल्लक उरतें.

 आतांपर्यंत केलेल्या विवेचनांत ज्या अनेक पायऱ्या दाखविल्या, त्या तुह्मास धर्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरितांच आहेत. परमेश्वरप्राप्तीसाठी कसल्याहि प्रकारच्या विवाद शिक्षणाची अपेक्षा नाही. परमेश्वराला तुमच्या विद्वत्तेची आवड नसून मात्र अंतःकरणाची आवड आहे. एका साधु महाराजांनी मला सांगितले की, असुरचा वध करावयाचा असला तर आपल्याजवळ बंदुक किंवा तरवार यासारखें हत्यार असावे लागते; पण आत्महत्या करावयास एखादी सुई सुद्धा पुरी होते. त्याच प्रमाणे ज्याला लोकशिक्षणाचे काम करावयाचे आहे, त्याला