पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

दाब हळु हळु ढिला करूं लागतील. आपण परमेश्वराशी एकरूप झालों ह्मणजे आपली गुलामगिरीची दशा संपून आपण विश्वनियमांचे धनी होऊ. गुलामगिरीतून निघून धनीपणाकडे जाण्याचा हाच मार्ग आहे.

 आतांपर्यंत सांगितलेल्या मार्गाने आपण चालू लागलों तर कोणाच्याहि मदतीवांचून आपणांस हा मार्ग आक्रमण करता येईल. आपण वस्तुतः सर्वज्ञ आहों. आपला आत्मा स्वभावतःच परिपूर्ण असा आहे. परंतु सृष्टीच्या करड्या अंमलबजावणीनें तो परतंत्र आणि मूर्ख असल्यासारखा दिसतो. आपल्या पूर्ण ताब्यांत आलेल्या या आत्म्यावर सृष्टपदार्थ एकसारखें अज्ञानाचें झांकण' घालण्याचाच जणूं काय उद्योग करीत आहेत! अशा स्थितीत आह्मी करावें तरी काय ? वास्तविक विचार केला तर आपणांस कांहींच करावयास नको. जो स्वयं पूर्ण आहे, त्याला आणखी पूर्णत्व तें कशाने द्यावयाचें ? सर्वज्ञाला कोणी व कोणतें ज्ञान द्यावयाचें ? पूर्णत्वावरचा पडदा दूर झाला की स्वतः पूर्ण असलेला आत्मा आपल्या स्वत:च्या संपूर्ण तेजाने प्रकाशेल. हे उत्तर जितके सोपे वाटतें तितका अनुभवाचा मार्ग मात्र सोपा नाही.

 आत्म्याला मूळची पूर्णावस्था प्राप्त करून देण्याकरितां आपणांला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. प्रत्येक क्षणी आपणांस नित्यानित्यविवेक केला पाहिजे. धर्मज्ञानाकरितां इतक्या बंधनांची काय आवश्यकता आहे असे कोणी विचारील, तर त्यास उत्तर इतकेंच की परमेश्वरप्राप्तीचा मार्ग अनुभवाचा आहे. तो बुद्धिगम्य मार्ग नव्हे, हे नित्य लक्ष्यांत राहिले पाहिजे. इंद्रियगम्य ज्ञानाने परमेश्वरप्राप्तीचा मार्ग दिसणे शक्य नाही. आपण कानाने जे काही ऐकतों, डोळ्यांनी पाहतो आणि बुद्धीने जाणतो त्या ज्ञानानें परमेश्वरप्राप्ति होणार नाही. तर जें कांहीं आपण ऐकलें, पाहिले अथवा जाणले त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण आपल्या ठिकाणी घेतला पाहिजे. आपण कितीहि धर्मपुस्तके वाचलीं, जगांतल्या सर्व ग्रंथांची पारायणे केली तरा सचा धर्मज्ञानाच्या एका शब्दाचाहि बोध आपणांस होणार नाही. सारा जन्म वादविवाद केला, तरी त्यामुळेहि परमेश्वराची प्राप्ति न होता तो अधिक दुरावण्याचा मात्र संभव आहे. सर्व विश्वांत अत्यंत बुद्धिमान ह्मणविण्याजोगी बुद्धिमत्ता आपण संपादिली तरी परमेश्वरप्राप्तीच्या मागांत एक पाऊलहि पुढे पडणार नाही. जें बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे. तेथे बुद्धि पोहोचणार तरी कशी? आपल्या सर्व शिक्षणाची दिशा पाहिली तर बुद्धि प्रज्वलित करण्याकडे आहे .