पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१९१

वास्तविक तथ्य किती आहे, याचा जर आपण विचार केला तर इंद्रियजन्यसुखाचे गुलाम होऊन राहणे आपणांस खचित पत्करणार नाही. दोन गोड शब्द कोणी बोलला तर आह्मांस आनंद व्हावा आणि दोन कडू शब्दांबरोबर आह्मी दुःखाच्या खाड्यांत पडावें, ही स्थिति खरोखर लाजिरवाणी आहे. आमच्या एकंदर आयुष्यक्रमाचा विचार करतां त्यांत गुलामगिरीवांचून कांहींच आढळत नाही. आह्मी पोटाचे गुलाम; आह्मी आमच्या पोषाकाचे गुलाम; आह्मी आमच्या देशाचे आणि देशाभिमानाचे गुलाम; आणि आह्मी कीर्तीचे-मोठ्या नांवाचे-गुलाम. इतक्या अनंत गुलामगिऱ्यांमुळे आमचें ईश्वरत्व विचारें झांकून गेले आहे. आह्मी आमच्याच हाताने त्यास मूठमाती दिली आहे! अजून आह्मांस या शृंखला जाचक वाटत नाहीत! पिंजऱ्यांतल्या पोपटाला ज्याप्रमाणे चकचकीत पितळी तारांचे आणि बिलोरी वाट्यांचे भूषणच वाटते, तशीच आह्मां मनुष्यांचीहि गोष्ट आहे. या गुलामगिरीचें खरें स्वरूप समजू लागले ह्मणजे सध्याच्या सुखोत्पादक वस्तूंचे खरें स्वरूप दिसू लागतें; आणि यांतून मोकळे होण्याची आपणांस उत्कट इच्छा होते. धगधगीत निखारा कोणी आपल्या मस्तकावर ठेविला तर तो काढून टाकण्यास आपण जितके अधीर होतो, तितक्याच अधीरपणाने आपण या सुखदुःखांबाहेर जाण्याची खटपट करूं लागतो. अशा प्रकारची उत्कट इच्छा होणे याचें नांव मुमुक्षुत्व.

 यानंतर मुमुक्षुनें नित्यानित्य विवेक केला पाहिजे. या जगांत नित्य वस्तु कोणती आणि अनित्य वस्तु कोणती-चिरकालिक टिकणारी वस्तु कोणती आणि क्षणभंगुर कोणती-याचा नित्य विचार केला पाहिजे. परमेश्वराशिवाय बाकीचें सर्व विश्व अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, ही गोष्ट त्याने सदोदित आपल्या मनावर ठसविली पाहिजे. विश्वांतील प्रत्येक स्थितीला आणि प्रत्येक वस्तूला शेवट आहे. पशुपक्षी आणि मनुष्ये मर्त्य आहेत. सूर्य चंद्र आणि इतर आकाशस्थ गोल यांचाहि एके दिवशी शेवट होणारच. यांतील प्रत्येक वस्तूंत क्षणोक्षणीं बदल होत आहे. आज जेथें उंच पर्वत आपण पाहतो तेथे उद्यां कदाचित् खोल समुद्र होईल. जगांतील यच्चयावत् वस्तूंत प्रत्येक क्षणीं बदल होत आहे. परंतु ज्याला कोणत्याहि प्रकारचा बदल ठाऊक नाही, असा एक परमेश्वर मात्र आहे. आपण प्रत्येक क्षणी बदलत आहों; पण जसजसे आपण परमेश्वराजवळ जाऊ तसतसें आपल्यांतील फरकाचे प्रमाण कमी कमी होत जाईल. ज्या सृष्टिनियमांच्या ताब्यांत राहून आज आपण गुलामांसारखे राबत आहों ते सृष्टिनियम आपला