पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

'आशा.' सर्वांत आशा मोठी आश्चर्यकारक आहे. भोवताली अनंत प्रकारची दुःखें पसरलेली पाहत असतांहि आह्मी सुखाची आशा करतो. मृत्यूचें अविरत साम्राज्य पहात असतांहि आपण सदोदित जिवंत राहूं अशी आशा आपणांस असते. आपणांला कांहीं दु:ख होईल अथवा आपणांवर केव्हां तरी मृत्यूचा घाला पडेल असे आपल्या मनांत कधीच येत नाही. सध्याच्या स्थितीत सुखप्ताप्ति होण्याचा यत्किंचित् हि संभव नाही असे कोणी खडे मांडून सिद्ध केले तरी आमची समजूत पडतच नाही. आपल्याभोवती वास्तविक सुखी असा एकहि प्राणी नाही. एखादा श्रीमंत असून त्याला खाण्यापिण्याची चंगळ असली तर त्याला बद्धकोष्ठाचा विकार असावयाचा. एखाद्या खाण्याच्या वस्तूकडे पाहण्याबरोबर बिचाऱ्याला उलटी येते! एखाद्याची क्षुधा अत्यंत प्रखर असली, तर त्याला घांसभर अन्न मिळण्याची मारामार ! कोणी श्रीमान् संतति नाही ह्मणून शोक करितो, तर एखादा भिकाऱ्याच्या मागे मुलांचा एक सबंध तांडा असतो! इतक्या मुलांना खायला काय घालावें या विचारांतच तो सदा चूर असतो! असें कां असावे हा मोठया विचाराचा प्रश्न आहे. याचे उत्तर असें की सुख आणि दुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहेत. नाणे हवे असले तर ज्याप्रमाणे राजाच्या मुखवट्याबरोबर उलट बाजूचा शिक्काहि घेतलाच पाहिजे त्या प्रमाणे सुखप्राप्ति हवी असेल तर दु:ख भोगण्याचीहि तयारी केलीच पाहिजे. पण आमची अशी समजूत न पडल्यामुळे निर्भेळ सुखाची आह्मी आशा करीत बसतो. या आशेच्या नादी लागून पळतां पळतां आह्मी इंद्रियांच्या जाळ्यांत मात्र गोंवले गेलो आहो. आमचे धनीपण जाऊन गुलामगिरी आमच्या नशीबी आली आहे.

 मी बोस्टन शहरी असतां एकेवेळी एक तरुण मला भेटला. त्याने एक कागद माझ्या हाती दिला. 'जगांतील सर्व संपत्ति आणि सुख तुमचेच आहे. ते कसे मिळवावें हें शिकावयाचे असेल तर माझ्याकडे या. फी रुपये पंधरा.' हा कागद माझ्या हाती देऊन तो ह्मणाला, 'तुह्मांला हे पसंत पडते की नाही ?' मी उलट विचारले, 'भल्या गहस्था, हा मजकूर छापून घेण्याइतका पैसा तुजपाशीं नाहीं काय ?' माझ्या प्रश्नाचा भावार्थ त्याच्या लक्ष्यांत आला नाही. कांहीसुद्धां मेहनत न करतां खूप पैसा आपणांस मिळेल हेच खूळ त्याच्या डोक्यांत शिरलें होते. जगाच्या सामान्य व्यवहारांत आपणांस दोन प्रकारची माणसे आढळून येतात. आशावादी लोकांना हे जग ह्मणजे केवळ सुखाचें आगर वाटते.