पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१८७

त्यावेळी कांहीं कैदी सुटले त्यांत तो होता. तुरुंगांतून बाहेर पाय ठेवतांक्षणींच त्याने मोठमोठ्याने रडण्यास आरंभ केला. त्याचे कारण विचारतां तो ह्मणाला, 'या जगांत मी जिवंत कसा राहणार ? येथे माझी काळजी कोण घेईल ? माझ्या अंधारकोठडीत मला परत पाठवा. तेथले उंदीर आणि घुशी यांचे मजवर मोठे प्रेम आहे. या उजेडाकडे पाहून मी आंधळा होण्याच्या बेतास आलो आहे. मला माझ्या कोठडीत परत पाठवा अथवा मारून तरी टाका !' त्याला त्याच्या कोठडीत परत पाठविले तेव्हां तो शांत झाला. आह्मा मनुष्यांची स्थितिहि अशीच आहे. एक दुःख संपलें न संपलें तोच आह्मी दुसऱ्याच्या पाठीस लागून पळत सुटतो. दुःखमुक्तीचा उपाय कोणी आह्मांस सांगितला तर तो सांगणारा आह्मी शत्रूसारखा मानतो. एखाद्या सुखाच्या पाठीमागे मोठ्या आशेनें लागावें, तें मिळण्याकरितां दु:खें सोसावी आणि शेवटी पाहावें तों तें सुख कोठेच नसते. आपण त्याला आतां धरणार असे वाटत असतां असतांनाच तें हातांतून निघून जाते. असे अनेक अनुभव एकामागे एक येत गेले तरी आह्मी शहाणे न होतां व सुखकल्पनांचा पाठलाग सोडून न देतां पुन:पुनः धांवत सुटतो. खरोखर आम्हासारखे मूर्ख आणि आंधळे आह्मीच ! दुसरे काय ह्मणावें ! बैलाने लवकर चालावें ह्मणून एका तेल्याने एक गमतीची युक्ति योजिली होती. बैलाच्या मानेवर जे लांकडाचें जूं असतें त्यावर त्याने एक काठी आडवी बांधली होती व तिच्या टोकावर थोडेसें गवत बांधिले होते. ही योजना अशा प्रकारची केली होती की ती गवताची पेंढी नेहमी त्या बैलाच्या डोळ्यांसमोर राहावी. एक वीतभर अंतर आहे तेवढे कमी झाले की आपणास गवत खावयास मिळेल असें त्या बैलाला वाटे. तें वितीचे अंतर तुटण्याकरितां त्या बैलाने खूप धावपळ चालविली; परंतु कित्येक तास फिरूनहि तें वितीचे अंतर कमी झाले नाही. आह्मा मनुष्यांची गोष्टहि अशीच आहे. इंद्रियजन्यसुखाचे गुलाम बनून आज अनंत काल कनककामिनीच्या मागे आह्मी धांव घेत आहो. अनंत जन्मांचे फेरे खाऊनहि आज आह्मी पुन्हां जागच्या जागीच आहों. सुख व आह्मी यांमधील वितीचें अंतर अद्यापिहि कमी होत नाही. प्रेम, प्रेम ह्मणून आह्मी भ्रमिष्ट होऊन फिरत आहों. प्रेम, प्रेम ह्मणून आम्ही पुत्रकलत्रांच्या गळ्यास मिठी मारतो आणि त्यांनी उलट मिठ्या मारण्याची इच्छा करतो. एकामेकांच्या पाशांत गुंतलेला आमचा घोळका आज अनंतकाल सुखाच्या पाठीस लागला आहे; पण जों जो आमची धावपळ अधिक तों तो सुखाचीहि गति अधिक होत जाते, व शेवटी पाहावें तों