पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

एखाद्या मनुष्याने काही सांगितले तर त्याचा अनुभव नसतां तें खरें मानावयाचे ही श्रद्धा नव्हे. श्रद्धा आणि अंधविश्वास यांचा आपल्या डोक्यांत पुष्कळ वेळां घोंटाळा असतो. अंधविश्वास हा खोट्या नाण्यासारखा आहे. त्यामुळे प्रसंगी फजिती पावण्याची वेळ येते. श्रद्धा ह्मणजे परमेश्वरप्राप्तीची अत्यंत उत्कंठा, इतकी की त्यावांचून दुसरें कांहींच चित्तांत नसणे.

 श्रद्धेनंतरची पायरी समाधान ही आहे. समाधान ह्मणजे आपल्या मनाची स्थापना सदोदित परमात्म्याच्या ठिकाणी करणे. परमेश्वरावांचून अन्य कशाचेहि चिंतन न करणे, सुखप्रसंगीहि त्या सुखाचा विचार सोडून परमेश्वराच्या ठिकाणी मन लावणे आणि त्याचप्रमाणे दु:खाचा कडेलोट झाला तरी त्यावेळी हि परमेश्वराचेंच चिंतन करणे याला समाधान असें ह्मणतात. हे एका दिवसांत प्राप्त होणारे नाही. धर्म ह्मणजे साखरेची गोळी नव्हे, की उचलली आणि टाकली तोंडांत. अविरत आणि अत्यंत कठीण अशा परिश्रमाने हे प्राप्त होणारे आहे. आपले मन आवरणे ह्मणजे वाऱ्याची मोट बांधण्याइतकेंच सोपे आहे, ही गोष्ट खरी; परंतु हळूहळू प्रयत्न केला तर ते अगदी असाध्य आहे असें नाहीं. 'असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते॥' असें श्रीकृष्णांनी सांगितले आहे.

 समाधानानंतरची पायरी मुमुक्षुत्व ही होय. मुमुक्षुत्व ह्मणजे मुक्त होण्याची इच्छा. सर एड्विन् आर्नोल्ड यांनी इंग्रजीत लिहिलेले बुद्धचरित ( Light of Asia ) तुह्मी वाचले असले तर बुद्धाने केलेल्या उपदेशांतील एक भाग विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखा आहे, तो तुह्मांस स्मरत असेलच. बुद्ध ह्मणतो, 'तुम्हीच आपले शत्रु असून स्वतःचे नुकसान करून घेतां; दुसरा कोणी तुमचे नुकसान करीत नाही. सर्व आयुष्यभर, मरेपर्यंत दुसऱ्या कोणाचा तुमच्यावर ताबा नाही. संसारचक्राबरोबर गरगर फिरून तुह्मी दुःखाला कवटाळता आणि त्याचे चुंबन घेतां. संसारचक्राबरोबर फिरता फिरतां तुह्मांस अश्रु गाळण्याच प्रसंग येतात आणि इतकेंहि करून तुझी काय मिळविले हे पाहिल तर काही नाही हेच उत्तर येणार.'

 आपणांवर जी जी दु:खें कोसळतात ती ती आपल्या इच्छेनेंच कोसळतात. आपला स्वभावच असा आहे की, जणूं काय दु:खें ही आपल्या जीविताचा एक घटकच होऊन बसली आहेत. दुःखांशिवाय आम्हांस चैनच पडत नाहींसें वाटतं. एका चिनी कैद्याला तुरुंगांत साठ वर्षे ठेविलें होतें. नवा बादशहा गादीवर बसला