पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१८५

क्रियाशून्य करून आपण स्तब्ध बसलों तरी आपण जे काय उद्योग केले असतील, जे काय पाहिले असेल, जे काय ऐकले असेल अथवा दुसऱ्या दिवशी जे काय पाहण्याचा अथवा ऐकण्याचा संभव आहे, जे काय आपण खाल्लंप्यालें असेल आणि जेथे आपण गेलों आलों असूं , त्या सर्वांचा आपण विचार करीत बसतो. आपण बाह्यतः अगदी क्रियाशून्य असतां आपलें मन काशी रामेश्वराचा प्रवास करते आणि अनेक प्रकारच्या विचारांत गढून गेलेले असते. ज्याला वेदांती व्हावयाचे असेल, सम्यग्ज्ञान ज्याला हवे असेल त्याने ही संवय सोडून दिली पाहिजे. स्वतः स्तब्ध असतां ज्याप्रमाणे या गोष्टींचा विचार करावयाचा नाही, त्याच प्रमाणे या गोष्टींविषयी इष्टमित्रांशी वाटाघाटहि करावयाची नाही, असा निश्चय त्याने केला पाहिजे.

 उपरती नंतरची पायरी श्रद्धा ही होय. श्रद्धा ह्मणजे विश्वास. परमेश्वर आणि धर्म यांजवर ज्यांचा अढळ विश्वास असेल, त्यांसच हा अनुभवाचा मार्ग सांपडेल. ज्याचा हा विश्वास अत्यंत दृढ नसेल त्याने ज्ञानप्राप्तीची आशाच करूं नये. याच साठी 'श्रद्धावांल्लभते ज्ञानम् ' असा सिद्धांत सांगितला आहे. वास्तविक पाहिले तर कोट्यवधि मनुष्यांत एखाद्याचाच खरा विश्वास परमेश्वराच्या ठिकाणी असतो असे एका साधु महाराजांनी मला सांगितले. मी त्यावर त्यांना विचारिलें 'महाराज असें कसें ह्मणतां? परमेश्वरावर आमचा विश्वास आहे, असे ह्मणणारे किती तरी आढळतात. महाराज ह्मणाले, 'अशी कल्पना कर की एका खोलीत एखादा चोर बसला आहे आणि त्याच्या शेजारच्या खोलीत मोठा द्रव्यनिधि असल्याचे त्याला समजले, तर त्याची काय स्थिति होईल?' मी उत्तर दिले 'पापणीला पापणी सुद्धा लावण्याची त्याला इच्छा होणार नाही; मग झोपेचें नांवच नको. तें द्रव्य आपल्या हाती कसें येईल, याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचें तो चिंतन करणार नाही.' माझें हें उत्तर ऐकून महाराज ह्मणाले, 'तर मग परमेश्वराचे अस्तित्व मान्य करणारा मनुष्य त्याला प्राप्त करून घेण्यासाठी अगदी वेडा होणार नाही काय? ज्या ठिकाणी दु:खाचे वारेंहि लागू शकत नाही असे एखादे ठिकाण आपल्या हस्तगत होण्याचा संभव आहे असें ज्यास खरोखर मनापासून वाटते त्याला तें ठिकाण हस्तगत करून घेईपर्यंत दुसरी कोणतीहि गोष्ट सुचणे तरी शक्य आहे काय ?' परमेश्वरावर परमावधीचा विश्वास आणि त्याला प्राप्त करून घेण्याची अत्यंत उत्कंठा असणे यालाच श्रद्धा असें ह्मणतात. श्रद्धा ह्मणजे अंधविश्वास नव्हे. कोणत्या तरी एखाद्या ग्रंथांत अथवा