पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आणणे ह्मणजे तें असिधाराव्रतच आहे. कोणी मनुष्य मला कांहीं अपशब्द बोलला तर जीभ आंवरून धरून मी त्यास उलट दुरुत्तर देणार नाही; परंतु माझ्या मनाची स्थिति काय होईल बरें ? मला बिलकुल राग आला नाही अथवा त्या मनुष्याचा मी यत्किचिहि द्वेष करीत नाही अशी मी बाह्यतः बतावणी करू शकेन. परंतु माझें मन मात्र त्या मनुष्याबद्दल सदोदित संतप्तच राहील. अंतस्थ विचारांचा बाह्यतः उद्रेक होऊ नये इतकी खबरदारी, फार तर, मी घेऊ शकेन. परंतु माझें मन अनावर होऊन त्या विचाराने सदोदित संतप्त राहिले तर मला तितिक्षत्व प्राप्त झालें असें ह्मणतां येणार नाही. रागाची यत्किचित् छटाहि माझ्या चित्तांत उद्भवतां कामा नये. मला त्या मनुष्याबद्दल द्वेषही वाटतां कामा नये; जणूं काय, विशेष असे काही घडलेच नाही असे माझ्या मनास वाटण्या इतकी माझी तयारी झाली ह्मणजे अप्रतिकाराच्या तत्वाची खरी अंमलबजावणी मी केली असें होईल. जोपर्यंत रागद्वेषांची यत्किंचित् छटा माझ्या मनांत उद्भवत आहे, तोपर्यंत बाकीच्या माझ्या बाह्यवर्तनाची किंमत नाटकांतील सोंगापेक्षा अधिक नाही. यदृच्छेनें कसल्याहि प्रकारची स्थिति प्राप्त झाली आणि कितीहि संकट कोसळली तरी त्यांचा प्रतिकार करावयाचा नाही इतकेच नव्हे तर त्यांमुळे आपल्या मनांतहि कांहीं चलबिचल होऊं द्यावयाची नाही, इतका ताबा ज्या दिवशी माझ्या मनावर मला चालवितां येईल त्या दिवशी मला तितिक्षा प्राप्त झाली असें होईल. आपण अशी कल्पना करूं की एखाद्या विशिष्ट गोष्टीचा प्रतिकार मी वेळीच न केल्यामुळे एखादें संकट मजवर ओढवले. अशा वेळी, वेळीच प्रतिकार न केल्याचा पश्चात्ताप मला होता कामा नये. इतका समतोलपणा माझ्या मनास प्राप्त झाला ह्मणजे माझ्या ठिकाणी तितिक्षा पूर्णपणे बाणली असें ह्मणतां येईल. आपल्या अंगी तितिक्षा यावी याकरितां आर्यावर्तातील लोक जो अभ्यास करितात, त्याचे वर्णन ऐकूनच तुह्मास नवल वाटेल. मनास यत्किचिहि दिक्कत वाढू न देतां कित्येक अभ्यासी सूर्याचा आणि अग्नीचा प्रचंड ताप सहन करितात. अंगावर हिमपात झाला तरा त्याचा कित्येक पर्वा करीत नाहीत. हे जड शरीर जणू काय अस्तित्वातच नाही अशा भावनेचा ते अभ्यास करितात. जड शरीराचे जे काय होण असल त यदृच्छन होवो; त्याचा व आपला काही संबंधच नाही अशा प्रकारचीत्यांची वागणूक असते.

 तितिक्षेच्या नंतरची पायरी उपरति ही होय. इंद्रियद्वारा येणाऱ्या संवेदना चित्तांत घोळू न देणे याचे नांव उपरति. आपली बहिरिंद्रियें अथवा उपकरणे